नागपूर: ‘एम्स’मध्ये एमआरआय तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना काॅन्ट्रास्टच्या नावावर लुबाडले जात असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित करताच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत एम्सचा एक तंत्रज्ञ एक काॅन्ट्रास्ट तीन रुग्णांसाठी वापरून शिल्लक दोन रुग्णांचे काॅन्ट्रास्ट संबंधित दुकानात परत करून पैसे कमावत असल्याचे पुढे आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एम्स प्रशासनाच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी एक कंत्राटी तंत्रज्ञ आणि दलाल अशा दोघांना अटक केली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींनी ते एमआरआयसाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाला काॅन्ट्रास्ट आणायला सांगत होते. हे एक काॅन्ट्रास्ट तीन रुग्णांना लावून ते दोन रुग्णांचे काॅन्ट्रास्ट वाचवायचे. त्यानंतर ते परत करून पैसे परत घ्यायचे.

हेही वाचा… गडचिरोली: पदवी प्रवेशाचे स्वप्न भंगले! अपघातात मामा-भाचीचा मृत्यू

हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने एम्सच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, या विषयावर विचारणा करण्यासाठी एम्सचे संचालक डॉ. हनुमंत राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले. एम्सचे विजयकुमार नायक यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे एम्सचे अधिकारी या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. एकच काॅन्ट्रास्ट तीन रुग्णांसाठी वापरल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे सोनेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांनी सांगितले.

दुसऱ्या रुग्णांमार्फत परत करायचे औषध

एम्सचा तंत्रज्ञ आणि दलाल काॅन्ट्रास्ट इंजेक्शन परत करण्यासाठी औषध दुकानात लांब रांग असल्याचे सांगायचा. घटनेच्या दिवशी दलालाने प्रथम मुखपट्टी लाऊन, त्यानंतर विनामुखपट्टी औषध परत केले. तिसऱ्यांदा एका वृद्ध महिलेच्या मदतीने इंजेक्शन परत करताना औषध दुकानदाराने तिला विचारणा केली. त्यावर वृद्धेने एका पुरुषाने ते परत करायला लावल्याचे सांगितल्यावर हा प्रकार उघड झाला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A single contrast was used for three patients coming for mri examination at aiims nagpur mnb 82 dvr