राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनात तुफान टोलेबाजी केली आहे. त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा उल्लेख कोल्हापूरचा ढाण्या वाघ असा केला. तसेच सरकारच्या गलथान कारभारारून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.
अजित पवार अधिवेशनात म्हणाले की, “तुमच्या दोघांचं (एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस) फार ‘बेस्ट’ चाललं आहे. देवेंद्रजींना काही विचारलं तर ते मुख्यमंत्र्यांची संमती आणा, असं म्हणतात. त्या महाराजांना (मुख्यमंत्री) काही विचारलं की ते म्हणतात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मी करतो. म्हणजे ही नुसती इकडून तिकडे आणि तिकडून इकडे टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे दादा (चंद्रकांत पाटील) मला तुमची कधी कधी इतकी आठवण येते की, तुमच्यासारखी व्यक्ती असती तर अशी टोलवाटोलवी झाली नसती.”
उपरोधिक टोला लगावत अजित पवार पुढे म्हणाले, “आमच्या कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला (चंद्रकांत पाटील) केवळ एक-दोन साधे विभाग देऊन त्यांना बाजुला ठेवलंय. स्वत: सहा-सहा महत्त्वाची विभागं घेतली आहेत. अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करत आहात, हे बरोबर नाही. तुम्हाला कोल्हापूरच्या ढाण्या वाघाचा तळतळाट लागेल,” असंही पवार म्हणाले.
अजित पवारांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. अजित पवारांच्या मागच्या बाकड्यावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना हसू आवरता आलं नाही.