शफी पठाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांचे अतिक्रमण कमी करण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाने २०१६-१९ या काळात प्रथमच आयोजकांना लेखी सूचना पाठवण्याचा पायंडा पाडला. उस्मानाबादच्या संमेलनात राज्यकर्त्यांना व्यासपीठाखाली बसवण्याचाही प्रयोग झाला. परंतु, आता पुन्हा साहित्याच्या मंचावर राजकीय नेत्यांचा वावर वाढला असून यंदा अमळनेरात होणाऱ्या ९७ व्या मराठी साहित्य संमेलनात उद्घाटन व समारोपाला चक्क आठ मंत्र्यांची मांदियाळी राहणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी असतील. याशिवाय संमेलनाचे स्वागताध्यक्ष गिरीष महाजन, प्रमुख संरक्षक गुलाबराव पाटील व संमेलनाचे निमंत्रक म्हणून अनिल पाटील यांचाही मंचावर सतत वावर राहणार आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा जिल्हा हादरला! वयोवृद्ध सासऱ्याने केली गर्भवती सून व नातवाची निर्घृण हत्या; मारेकऱ्याला अटक

यंदा निवडणुकीचे वर्ष आहे. ही बाब डोळय़ापुढे ठेऊन या संमेलनाचा पुरेपूर राजकीय वापर कसा करून घेता येईल, यासाठी ज्यांनी हे संमेलन अमळनेर येथेच व्हावे, याकरिता प्रभावी ‘समन्वयका’ची भूमिका वठवली ते कामाला लागले आहेत. त्यांच्याच नेतृत्वात पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली असून तीन दिवसांच्या या संमेलनात विरोधी पक्षातील एकाही नेत्याला स्थान मिळू नये, यासाठी पद्धतशीर ‘मोर्चेबांधणी’ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

ज्वलंत विषयावर परिसंवाद नाहीच

मराठा-ओबीसी आरक्षणावरून राज्यात वादळ उठले आहे. नोकरीसंबंधीच्या विविध आंदोलनातून तरुणाईही आपला आक्रोश व्यक्त करीत आहे. जाती-धर्माच्या भिंती दिवसागणिक आणखी मजबूत होत आहेत. या सर्व विषयांचे प्रतिबिंब साहित्यात कसे उमटतील, या घटनांचा समाजावर कसा परिणाम होईल, यावर ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे..’ अशी शिकवण देणाऱ्या साने गुरुजींच्या कर्मभूमीतील संमेलनात चर्चा अपेक्षित होती. परंतु, आयोजकांनी ज्वलंत विषय टाळून मळलेल्या वाटेनेच संमेलनाची कार्यक्रम पत्रिका अंतिम केल्याची टीकाही साहित्य वर्तुळातून होत आहे.

यंदाचे अमळनेर येथील संमेलन म्हणजे मंत्र्यांचे, मंत्र्यांकरवी मंत्र्यांनी आयोजिलेले, मंत्र्यांतिरेकाचे अभूतपूर्व संमेलन आहे. राजसत्तेची व्यासपीठीय उपस्थिती नगण्य करण्यापर्यंत हे संमेलन आणले गेले होते. नंतर राजसत्तेला व्यासपीठाखाली बसवण्याच्या वल्गना महामंडळाने करून झाल्या. आता तर मंत्र्यांच्या संख्येचा अतिरेकच झालेला दिसत आहे. – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष. अ. भा. म. साहित्य महामंडळ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bharatiya sahitya mahamandal decided to send a written instruction to reduce the encroachment of political leaders on the platform of sahitya sammelan amy
First published on: 24-01-2024 at 03:24 IST