अकोला : महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर ‘एसटी’ आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे. गत काही दिवसात मराठा समाजासाठी ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसारच महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोरसेनेने वाशीममध्ये आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले.
गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात १० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले. निवेदनानुसार, निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ पर्यंत ‘हैदराबाद गॅझेट’मध्ये गोरबंजारा, लंबाडा, लमाण जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा, आंध्रप्रदेशातील समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे.
मात्र, १९४८ नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाड्यासह विदर्भ, खान्देश भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रुपांतरित केले. महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाजवळ १९५० अगोदर अनुसूचित जमातीचे दुर्मीळ पुरावे असून ‘हैदराबाद गॅझेट’मध्ये त्याचा उल्लेख आहे. मात्र, भाषावार प्रांतरचना, राज्य पुनर्रचना कायद्याचा फटका महाराष्ट्रातील गोरबंजारा लमाण, लंबाडी यांना बसला. मूळ आरक्षणाला मुकावे लागले आहे.
समाजाला न्याय देण्यासाठी बापट आयोग, इधाते आयोग, भाटीया आयोग, डिएनटी, एसटी आयोगाने गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक शिफारशी करूनही त्यांना ते देण्यात आले नाही. डोंगरात राहणारा समाज आजही आदीम समुदायाची सर्व पात्रता पूर्ण करतो. स्वतंत्र बोली भाषा, पेहराव, धाटी परपंरा, स्वतंत्र तांडावस्ती, खानपान स्वतंत्र असूनही त्यांना अनुसूचित आरक्षणापासून जाणीवपूर्वक टाळले जाते, असा आरोप केला.
अनुसूचित जमाती आरक्षणासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, राष्ट्रसंत रामराव महाराज यांच्यासह अन्य समाजसुधारकांनी सातत्याने प्रयत्न केले. मराठा समाजासाठी ‘हैदराबाद गॅझेट’ लागू होते. त्याच धर्तीवर गोरबंजारा समाजासाठी सुद्धा तेच ‘गॅझेट’ लागू करुन अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, अशी मागणी गोरसेनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी प्रा.डॉ. अनिल राठोड, गोरसेना जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, सचिव नीलेश राठोड, शितल राठोड, संतोष चव्हाण, गणेश राठोड, आश्विन राठोड, राजू राठोड, संजय राठोड, सुनील पवार, अतुल राठोड, सरपंच गोविंद राठोड, जगदीश जाधव, सुनील राठोड, अरुण राठोड यांच्यासह गोरबंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.