नागपूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्याहस्ते अहिल्यानगरमध्ये डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण सोहळा झाला. तर लोणी इथे त्यांच्याहस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. याशिवाय देशातला पहिला सहकारी कॉम्प्रेस बायो गॅस प्रकल्प आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचे उद्घाटन देखील झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शाह यांच्यासोबत आहेत. असे असतानाच काँग्रेसने गृहमंत्री शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अमित शाह यांच्याबद्दल नेमके काय म्हणाले पाहूया.
काँग्रेस पुन्हा संघ, भाजप संविधानविरोधी असल्याचा प्रचार करणार
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी नुकतीच दीक्षाभूमी ते सेवाग्राम अशी पदयात्रा काढली होती. याच धर्तीवर आता काँग्रेस वर्षभर पदयात्रा काढणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलणार’ अशा प्रचाराचा काँग्रेसला फायदा झाला होता. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून काँग्रेसने पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा हातात घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकताच शताब्दी वर्षातील विजयादशमी सोहळा साजरा केला. मात्र, संघ संविधानविरोधी असून समाजात कायम असत्य पसरवत आला आहे. त्यामुळे संघाने स्वत:ला विसर्जित करावे किंवा जाहीरपणे संविधानाचा स्वीकार करावा, हा संदेश जनतेला देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर पदयात्रा काढली जाणार आहे. संघाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत ही यात्रा चालणार असल्याची माहिती, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘सुपर मुख्यमंत्री’ यावर काय म्हणाले सपकाळ
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नाममात्र मुख्यमंत्री असून राज्याचा संपूर्ण कारभार हे गृहमंत्री अमित शाह चालवतात. कुठला पक्ष फोडायला, कुणाला पक्षात प्रवेश द्यायचा, राज्यासाठी कुठल्या योजना लागू करायच्या हे सर्व अमित शाह ठरवतात. मुख्यमंत्र्यांना काहीही अधिकार नसल्याने शाह महाराष्ट्राचे ‘सुपर मुख्यमंत्री’ असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीला गेले मात्र, खाली हातांनी परत आल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात ओला दुष्काळ पडल्यानंतरही शेतकऱ्यांना पुरेशी मदत करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. फडणवीस कुठलाही निर्णय स्वत: घेत नसल्याने राज्याची परिस्थिती बिकट होत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.
