Amit Shah on Balasaheb Thackeray: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जाहीर सभेला संबोधित करत असताना ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. तसेच यानिमित्ताने शिवसेनेवरही (ठाकरे) टीका केली. ऑपरेशन सिंदूरनंतर याची माहिती जगभरातील देशांना कळावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशात पाठविण्याचा निर्णय घेतला. हे खासदार पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करत आहेत. पण शिवसेनेच्या (ठाकरे) एका नेत्याने म्हटले की, ही कुणाची वरात जात आहे.

अमित शाह पुढे म्हणाले, मला समजत या उद्धव सेनेला झाले तरी काय? एकेकाळी हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष होता. आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती. पण उद्धव सेना सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला वरात म्हणतो. ज्यात त्यांचेही खासदार विदेशात गेले आहेत.

अमित शहा यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. “ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी हे सिद्ध केले की, हा नवा भारत आहे. २०४७ साली आपल्याला विकसित भारत तर बनायचे आहेच, पण असाही भारतही बनवायचा आहे, ज्याच्याविरोधात कुणाचीही डोळे वटारून पाहण्याची हिंमत व्हायला नको”, असेही अमित शाह म्हणाले.

ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टलाही यश

ऑपरेशन सिंदूरसह भारतात ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू होते, असे अमित शाह म्हणाले. “छत्तीसगडमध्ये ५ हजार फूट उंचीवर असलेल्या नक्षलवाद्यांच्या तळांना सीआरपीएफ, छत्तीसगड पोलीस आणि बीएसएफने संयुक्तरित्या कारवाई करत उध्वस्त केले. ३१ नक्षलवादी मारले गेले. त्यानंतर पुन्हा ३६ नक्षली मारले गेले. कैक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली, काहींना अटक झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आज मी जाहीर करतो की, ३१ मार्च २०२६ रोजी देशाच्या भूमीतून नक्षलवाद समाप्त झालेला असेल”, असेही त्यांनी जाहीर केले.

देवेंद्र फडणवीसांच्या कामाचे कौतुक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. पुढील पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीसांमुळे मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचणार आहे. सम्राट अशोकाच्या काळापासून दुष्काळाने ग्रस्त असलेला हा प्रदेश पाणीदार होणार असल्याचेही अमित शाह म्हणाले. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातील नद्यांचे पाणी मराठवाड्याच्या गाव आणि घरात पोहोचेल, असेही ते म्हणाले.