नागपूर : विदर्भातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने दिल्लीत बोलवल्याने आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुनंगटीवार-अमित शहा भेटीत नेमके काय ठरते याकडे भाजपसह इतरही पक्षांचे लक्ष लागले आहे.

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला दणदणीत यश मिळाल्यावर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात महत्वाचे खाते दिले जाईल, असा अंदाज होता. मात्र त्यांना मंत्रीच करण्यात न आल्याने ते नाराज आहेत, त्यांच्या समर्थकांनीही याबाबत स्पष्टपणे नाराजी बोलवून दाखवली आहे. स्वत: मुनगंटीवार यांची विधानसभेतील कामकाज लक्षात घेतले तर ते सत्ताधारी बाकावरून विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते.

मधल्या काळात त्यांनी पक्षात सर्वांसोबत जुळवून घेण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर शनिवारी त्यांना अमित शहा यांनी तातडीने दिल्लीला बोलवले. महाराष्ट्रातील राजकारणात अमित शहा महत्वाची भूमिका बजावतात. त्यांचे महत्व लक्षात घेता त्यांनी मुनगंटीवार यांना बोलवल्याने काही तरी महत्वाचा निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते या अपेक्षेने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तेवढेच मुनगंटीवार यांच्या परतण्याच्या शक्यताने त्यांचे विरोधक सुद्धा धास्तावले आहेत.

दरम्यान मुनगंटीवार यांनी त्यांना अमित शहा यांच्याकडून बोलवणे आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र कशासाठी बोलवले, त्याचा विषय काय याबाबत त्यांनी बोलणे टाळले.

मुनगंटीवर यांच्यासारखा अनुभवी नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर असणे यातूनच चुकीचा संदेश जात आहे, या शिवाय संघटनात्मक पातळीवरही मुनगंटीवार यांना अनुभव आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले आहे. मत्री म्हणून, नेता म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांची लोकप्रियता आणि कार्यक्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, यासाठी पक्षावरही दबाव आहे.. भाजपमध्ये मुनगंटीवार गडकरी समर्थक म्हणून ओळखले जातात.