अकोला शहरातील हरिहरपेठ भागात मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच दंगलखोरांनी काही दुचाकी आणि चारचाकीही पेटवल्या. या घटनेत दोन्ही गटांमधील १० जणांसह दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. दरम्यान, या दंगलीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला पोलिसांच्या कार्यपद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – VIDEO : “काही लोकांना मूर्खासारखं बोलायची सवय झालीये, त्यांनी आता…”; जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ आरोपाला फडणवीसांचं प्रत्युत्तर!

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“या दंगलीच्या निमित्ताने अकोला पोलिसांच्या कार्यपद्धीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काल अकोला शहरात एवढी मोठी दंगल झाली. मात्र, ज्या व्यक्तीने ती सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली, तो मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. त्याला एका राजकीय पक्षाचं पाठबळ असल्याचं दिसून येत आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

हेही वाचा – VIDEO : ‘सिल्व्हर ओक’वरील महाविकास आघाडीच्या बैठकीत काय चर्चा झाली? जयंत पाटील माहिती देत म्हणाले…

“अकोल्याचं पोलीस प्रशासन आम्हाला कोणताही प्रतिसाद देत नाहीत. काल दंगलीच्या वेळीही आम्ही पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद आम्हाला दिला नाही. ही दंगल रोखण्यात अकोल्याचे पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. राज्याचे गृहमंत्री हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी आता या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश द्यावे”, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंचाच विजय होणार!” आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत नाना पटोलेंना विश्वास, म्हणाले, “आयाराम-गयारामांना…”

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी अकोला पोलीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. “या दंगलीची माहिती नागपूर पोलिसांना तीन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्यांना यासंदर्भात एसआयटीचा अहवाल प्राप्त झाला होता. मग असं असताना अकोला पोलिसांनी या अहवालाची दखल का घेतली नाही. ही दंगल घडू नये, यासाठी अकोला पोलिसांनी पूर्व नियोजन का केले नाही? हे एकंदरीत अकोल्यातील पोलीस प्रशासनाचं आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं अपयशी आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.