अमरावती : सामान्य डब्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपाययोजना हाती घेतल्या असून २६ मेल / एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये कायमस्वरूपी प्रत्येकी चार अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीपासून रेल्वे गाड्यांमध्ये सामान्य श्रेणीचे डबे वाढविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आता एकाचवेळी २६ रेल्वेगाड्यांमध्ये हे सामान्य डबे जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे.
सामान्य डब्यांत होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ही उपाययोजना केली आहे. रेल्वे प्रशासन केवळ प्रिमिअम दर्जाच्या गाड्या सुरू करून केवळ उच्च वर्गातील प्रवाशांकडे लक्ष देत असल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्र्यांनी एकूण १० हजार सामान्य डबे गाड्यांना लवकरच जोडले जातील, अशी ग्वाही दिली होती. सामान्य प्रवाशांचा प्रवास सोयीचा व्हावा, या हेतूने प्रत्येक गाडीला किमान ४ सामान्य श्रेणीचे डबे असावेत, अशी दक्षता घेतली जात आहे. मध्य रेल्वेने या गाड्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
सीएसएमटी- बल्लारशहा नंदीग्राम एक्स्प्रेसला ५ सप्टेंबरपासून तर बल्लारशहा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या गाडीला ७ सप्टेंबरपासून डबे लागतील, दादर – बलिया विशेष गाडीला ८ सप्टेंबरपासून तर बलिया दादर या एक्स्प्रेसला १० सप्टेंबरपासून तसेच दादर – गोरखपूर विशेष गाडीला ६ स नर गोरखपूर – दादर एक्स्प्रेस या गाडी सप्टेंबरपासून, पुणे – नागपूर एक्स्प्रेस गाडीला ६ सप्टेंबर, तर नागपूर – पुणे एक्सप्रेस या गाडीला ७ सप्टेंबरपासून नवीन डबे जोडतील, कोल्हापूर – नागपूर एक्स्प्रेस या गाडीला ५ सप्टेंबर तर नागपूर कोल्हापूर एक्स्प्रेस या गाडीला ६ सप्टेंबरपासून वाढीव डबे जोडणार आहे.
सामान्य डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. अलीकडेच रेल्वे बोर्डाने मेल-एक्स्प्रेस गाड्यांतील सामान्य डब्यांची संख्या दोनऐवजी चार आणि सहा करण्यास मंजुरी दिली.गेल्या काही वर्षांत रेल्वेने सामान्य श्रेणीचे डबे कमी करण्यावर भर दिल्याने सामान्य प्रवासी नाराज झाले होते. अनारक्षित प्रवासाची मोठी अडचण निर्माण झाली होती. तातडीच्या कामासाठी प्रवास करावा लागतो, त्यावेळी आरक्षित तिकीट उपलब्ध होत नाही. त्यांना प्रतीक्षा यादीचे तिकीट काढून आरक्षित डब्यांमधून प्रवास करावा लागतो. काही जण उभे राहून किंवा मिळेल तिथे बसून लांबचा प्रवास करताना दिसतात.