अमरावती : चाकूचा धाक दाखवून एका ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेच्या मुलाला कंपनीत संचालक बनविण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ९१ लाख ५० हजार रुपये देखील आरोपीने उकळले. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
राहुल संतोषकुमार सिंह (४६, रा. नंदनवन, औरंगाबाद, मथुरा, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित ४८ वर्षीय महिलेने स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीला होत्या. त्यांचा मुलगा हा चार वर्षांपूर्वी एका जिमला जात होता. त्यावेळी त्याची ओळख राहुल सिंह याच्यासोबत झाली. दोघांत संवाद सुरू झाल्यावर महिलेच्या मुलाने राहुलला आपल्या घरी नेले. त्यावेळी मुलाने महिला व त्यांच्या पतीची ओळख राहुलसोबत करुन दिली. दरम्यान, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी महिलेचा मुलगा व राहुल असे दोघे बँकाकला गेले. तेथे राहुलने महिलेच्या मुलाला कंपनीमध्ये संचालक बनविण्याचे अमिष दाखविले. त्यामुळे महिलेच्या मुलाने राहुलला ९१ लाख ५० हजार रुपये दिले.
परंतु, राहुलने ते पैसे परत केले नाही. दरम्यान, राहुल याच्या वाढदिवसाला पीडित महिला व त्यांचे पती हे राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबतच पैसे परत कधी करणार, याबाबत विचारणा करण्यासाठी त्याच्या खोलीवर गेले. खोलीमध्ये गेल्यावर महिलेच्या पतीला फोन आल्याने ते बाहेर निघून गेले. त्यावेळी राहुल हा पीडित महिलेजवळ गेला. त्याने वाईट उद्देशाने त्यांच्या शरीराला स्पर्श केला. त्याचवेळी त्याने जवळील चाकू काढून महिलेच्या गळ्याला लावला. खोलीचे दार आतून बंद करुन त्याने महिलेसोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
याबाबत मुलगा व पतीला काही सांगितल्यास त्यांचा खून करेन, अशी धमकीसुद्धा त्याने महिलेला दिली. त्यानंतर एक दिवस पीडित महिला, त्यांचा मुलगा व राहुल असे तिघे शेत पाहण्याकरिता गेले होते. त्यावेळीही संधी साधून राहुलने पीडित महिलेसोबत असभ्य वर्तन करून त्यांच्या विनयभंग केला. त्यांना चाकूचा धाक दाखविला. याबाबत कुणाला काहीही सांगितल्यास तुझ्या मुलाला जिवाने मारुन टाकेन, अशी धमकीसुद्धा त्याने त्यांना दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुलविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.