अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे बळवंत वानखडे यांचा राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख लक्षवेधी ठरला आहे. कुठलाही राजकीय वारसा लाभलेला नसताना त्‍यांचा सरपंच ते खासदार हा प्रवास खाचखळग्‍यांचा देखील आहे. बळवंत वानखडे यांनी चर्चेतील चेहरा भाजपच्‍या नवनीत राणा यांना पराभवाची धूळ चारली. त्‍याआधी ते २०१९ च्‍या निवडणुकीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दर्यापूर तालुक्‍यातील लेहगाव येथील बळवंत वानखडे यांच्‍या राजकीय कारकिर्दीला खरी सुरुवात २००५ पासून झाली. २०१० पर्यंत ते लेहगाव ग्रामपंचायत सदस्‍य होते. त्‍यांनी सरपंचपदाची धुरा देखील सांभाळली.

हेही वाचा – वर्धा : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटचे अमर काळे ८० हजारांहून अधिक मतांनी विजयी, भारत जोडो अभियानाचे ध्येय सफल

रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रा. सू. गवई आणि दे. झा. वाकपांजर यांच्‍या तालमीत तयार होऊन बळवंत वानखडे यांनी रिपाइं गवई गटात विविध पदांवर कार्य केले. २०१२ मध्‍ये अमरावती जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य म्‍हणून निवडून आल्‍यानंतर त्‍यांनी आरोग्‍य आणि वित्‍त सभापती म्‍हणून देखील काम सांभाळले. २०१७ ते २०१९ या कालावधीत ते जिल्‍हा परिषदेचे सभापती होते. सहकार क्षेत्रातही बळवंत वानखडे यांनी चुणूक दाखवली. २००५ ते २०२० पर्यंत ते दर्यापूर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे संचालक होते. अमरावती जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्‍हणून देखील कार्य केले आहे.
२००९ मध्‍ये दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्‍हणून त्‍यांनी निवडणूक लढवली, त्‍यात त्‍यांना पराभव पत्‍करावा लागला, पण दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

२०१४ च्‍या विधानसभा निवडणुकीत दर्यापूरमधून ते रिपाइं गवई गटातर्फे निवडणूक रिंगणात होते. यावेळीही त्‍यांना पराभव पत्‍करावा लागला. पण, २०१९ मध्‍ये काँग्रेस पक्षाच्‍या उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि दर्यापूरमधून ३० हजारांहून अधिक मताधिक्‍याने ते निवडून आले. शांत, संयमी स्‍वभाव ही त्‍यांची जमेची बाजू. विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांसोबत देखील त्‍यांचे जिव्‍हाळ्याचे संबंध आहेत.

हेही वाचा – वडिलांची लाखांमध्ये कमाई तरीही मुलाला ‘आरटीई’तून प्रवेश! आणखी एका पालकाला अटक

अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांच्‍या अपक्ष उमेदवारीला काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीने पाठिंबा दिला होता. पण, त्‍यांनी निवडणुकीनंतर लगेच केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. त्‍यामुळे काँग्रेसच्‍या वर्तुळात अस्‍वस्‍थता होती. यावेळी नवनीत राणा यांच्‍या विरोधात सक्षम उमेदवार देणे हे महाविकास आघाडीसमोर आव्‍हान होते. आमदार यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखडे यांचे नाव पुढे करून दोन वर्षांपासून मोर्चेबांधणी केली. त्‍यांची उमेदवारी खेचून आणण्‍यात त्‍यांचा मोलाचा वाटा होता. शिवाय विजयश्री मिळवून देण्‍यात यशोमती ठाकूर यांचे योगदान चर्चेत आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati journey from sarpanch to mp balwant wankhade ascending graph of political career mma 73 ssb