नागपूर: बारामतीच्या लोकसभा निवडणुकीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाजमाध्यमांवर महाराष्ट्रात सर्वाधिक याच लढतीची चर्चा आहे. त्याचे कारण आहे तेथे होणारी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत. मात्र खरी राजकीय लढत आहे ती शरद पवार विरुद्ध भाजप आणि अजित पवार यांच्यात. विदर्भातील निवडणुकीचा टप्पा आटोपल्यानंतर शरद पवार गटाचे या भागातील अनेक नेते बारामतीत प्रचाराला गेले आहे. रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीला झालेल्या शरद पवार यांच्या सभेतही या नेत्यांनी हजेरी लावली होती. यात नागपूर जिल्ह्यातील काही नेत्यांचा समावेश होता.

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. बारामतीची लढत हायप्रोफाईल असल्याने तेथील प्रत्येक घडामोडींकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पक्षात फूट पडल्यावर शरद पवार यांनी त्यांच्या निवडक नेत्याच्या जोरावर व निष्ठावान कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्या जोमाने या निवडणुकीत उडी घेतली आहे. गावोगावी सभा घेत आहेत. याही वयात त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे फक्त त्यांच्याच पक्षाचे नव्हे तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील अनेक नेते त्यांच्या सोबतीला बारामतीला प्रचारासाठी गेले आहेत. त्यात विदर्भही मागे नाही.

हेही वाचा – यवतमाळ : तहसीलदाराच्या कारने दुचाकीस उडविले, दोघांचा मृत्यू

हेही वाचा – नागपूर : आई-वडिलांना बदनामीची धमकी; मुलीचे आठ महिने लैंगिक शोषण

नागपूरमधील पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनिल देशमुख, पवार गटाचे प्रवक्ते वेदप्रकाश आर्य, व ज्येष्ठ नेते जिल्ह्यातील काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार आणि अकोल्यातील राष्ट्रवादीचे नेत गुलाबराव गावंडे यांच्यासह अनेक नेते बारामतीत प्रचाराला गेले आहेत. रविवारी प्राचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत झालेल्या शरद पवार यांच्या सभेला सुनील केदार, अनिल देशमुख, गुलाबराव गावंडे व्यासपीठावर होते. आर्य दोन दिवसांपासून बारामती मतदारसंघात पवार यांच्यासोबत फिरत आहेत. पवार यांना मानणाऱ्या मोठ्या वर्गाचे लक्ष बारामतीच्या लढतीकडे लागले आहे.