लोकसत्ता टीम

अकोला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्यादरम्यान सुरक्षा यंत्रणेत मोठी चूक झाल्याचा आरोप होत आहे. नियोजित कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या वाहनाने थेट महामार्गाकडे निघाले. देवेंद्र फडणवीस पुढे गेल्यानंतरही त्यांचा सुरक्षा ताफा मात्र मागेच राहिला होता. हे लक्षात आल्यावर पोलिसांची मोठी धावपळ झाली. यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात चुकीचा प्रकार घडला होता.

भारतीय जनता पक्षाच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस रविवारी दुपारी अकोला दौऱ्यावर आले होते. शिवणी विमानतळावर दुपारी १.२० वाजताच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेता महाले आदी उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी खोटारडेपणाचा आरोप करून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर सक्रिय राहण्याच्या सूचना देखील फडणवीस यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा-“दुर्बल हिंदूंना गुलामीचा सामना करावा लागतो”, देवेंद्र फडणवीसांचे मत; म्हणाले, “सावधान! तोच प्रयोग…”

दरम्यान, नियोजित बैठक दुपारी पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस आपल्या वाहनाने निघाले. देवेंद्र फडणवीस आपल्या वाहनातून कृषी विद्यापीठाच्या विश्रामगृहात जातील, असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, पोलिसांचा अंदाज चुकवत देवेंद्र फडणवीस आपल्या वाहनातून थेट महामार्गाकडे रवाना झाले. त्यांना शिवणी विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण करायचे होते. देवेंद्र फडणवीस महामार्गाकडे रवाना झाल्यावरही पोलिसांच्या गाड्या विद्यापीठ परिसरातच होत्या. हे कळताच सुरक्षा ताफ्यात नियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धावपळ करून देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनामागे आपल्या गाड्या पळवल्या. देवेंद्र फडणवीस यांचे वाहन पुढे, तर त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा यंत्रणेच्या गाड्या मागे, असे चित्र निर्माण झाले होते.

आणखी वाचा-भाजप लोकसभेत ‘मविआ’तील तीन पक्षांसह ‘या’ चौथ्याविरोधात लढला – देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्याच्या सुरक्षा यंत्रणेत मोठी चूक झाल्याचे समोर येत आहे. या प्रकारावरून पोलिसांवर टीका होत आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात चूक झाल्याचा प्रकार घडला होता. अकोला दौऱ्यावर असतांना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्था व ताफ्याच्या नियोजनात दरवेळी चूक कशी होते? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.