नागपूर: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपुरात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान परवानगीवरून कडू यांची पोलीस अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाल्यावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात कडू यांनी पोलिसांना धारेवर धरत म्हटले की, बलात्कार झाल्यावर तुम्ही चार दिवसांनी घटनास्थळी जाता. शेतकऱ्यांची अडवणूक करता.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले होते. आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले होते. त्यामुळे नागपुरात वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनादरम्यान परवानगीच्या विषयावरून कडू यांच्याकडे पोलीस अधिकारी आले. त्यावर संतप्त होत कडू म्हणाले, आमच्याकडे परवानगी असतांना तुम्ही अडवणूक करता.
आम्ही मंच उभारायचा नाही काय?. तुम्ही गुलाम सारखे वागत आहात. तुम्हाला थोडीशी लाजही वाटत नाही. पोलीस पब आणि इतर दोन नंबरचे अवैध धंदे बरोबर चालू देते. बलात्कार झाल्यावर चार दिवसांनी तिथे पोहचते. शेतकऱ्यांना मात्र दमदाटी करते. हा प्रकार खपवून घेणार नसल्याचे कडू यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आज. त्यावर पोलिस अधिकारी सुरक्षेच्या कारणावरून परवानगीचा विषय घेऊन आल्याचे कडू यांना सांगत आहे. त्यावर कडू यांनी सर्वांना पोलिसांना संतापून टाळी वाजवायला लावल्यावर उपस्थित कार्यकर्ते टाळ्या वाजवताना दिसत आहे.
बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेचे निमंत्रण स्वीकारले
माजी आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिलेले चर्चेचे दिलेले निमंत्रण स्वीकारले. कडू यांनी मुंबईत चर्चेला जाणार असल्याचे सांगताच अनेक आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु त्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. चर्चेशिवाय तोडगा निघत नसल्याचे ते आंदोलकांना सांगत होते. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही होते.
नागपूर-वर्धा मार्गावरील पांजरा येथील कापूस संशोधन केंद्राजवळ शेकडो आंदोलक काल रात्रीभर मुक्काम ठोकत आणि आज ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे बुधवारी दिवसभर नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. न्यायालयाने शेतकरी आंदोलनाची स्वत:हून दखल घेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली, पण आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना आदेशासह परत जावे लागले.
