नागपूर : नागपूर लगत राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देऊन बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये अंध,अपंग, मूकबधिर सुद्धा आहेत, पोलिसांच्या सूचना त्यांना ऐकू येत नाही, अंधाना पोलीस दिसत नाही,अपंगाना गर्दीतून चालताही येत नाही, अशा परिस्थितीत वाट अडवून बसलेल्या शेतकऱ्यांना तेथून हलवावे कसे असा यक्ष प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे आंदोलकांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करण्यावरही मर्यादा आल्या आहेत.

२८ ऑक्टोबरला बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा नागपुरात धडकणार याची पोलिसांना कल्पना होती, सरासरी २५ ते ३० हजार शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील, असा अंदाज पोलिसांना होता, त्यानुसार त्यांनी वर्धा मार्गावर शेतकऱ्यांना थांबता यावे म्हणून एक जागा निश्चित करून दिली होती.

मात्र मंगळवारी दुपारी चार पर्यंत बच्चू कडू यांचा मोर्चा निर्धारित स्थळी आलाच नाही, त्यांनी त्यापूर्वीच पांझरा मार्गानजिक रस्त्यावरच ठिय्या मांडला, सुमारे पंचवीस हजार शेतकरी रस्त्यावर बसल्याने पहिल्या दिवशी नागपूरकडे येणारे व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रागा वर्धा मार्गावर लागल्या.

आंदोलनात शेतकरी तर सहभागी आहेच. याशिवाय अंध,अपंग, मूकबधीरही आहे. त्यांच्याही मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. काल म्हणजे मंगळवारी बच्चू कडू यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी मोर्चावर बळाचा वापर करताना थोडा विचार करावा, अंधाना दिसत नाही, बधिरांना पोलिसांनी दिलेल्या सूचना ऐकू येणार नाही अन् अपंगांना पळता येणार नाही, याचा विचार करूनच पोलिसांनी हस्तक्षेप करावा, असे कडू म्हणाले. सरकारची कोंडी करण्यासाठीच कडू यांनी शेतकऱ्यांसोबतच अंपंगाना सोबत घेतल्याचेच दिसून येेते.