नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील मोठा शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा नागपूरकडे रवाना झाला आहे. बच्चू कडू स्वतः स्टीयरिंगवर असून त्यांनी शेतकऱ्यांसोबत ठाम निर्धार व्यक्त केला आहे की, कर्जमाफी मिळाल्याशिवाय मोर्चा माघार घेणार नाही. हा मोर्चा आज सकाळपासून पूर्व दिशेने नागपूरकडे निघालेला असून सध्या बुटीबोरी परिसराजवळ पोहोचला आहे. काही तासांत तो नागपूर शहराच्या हद्दीत प्रवेश करणार असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाकडून नागपूरकरांना वाहतुकीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बच्चू कडू यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरूच राहील आणि शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन, मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी आज उपराजधानीत माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार आंदोलन आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन सहभागी होणार आहेत.
आंदोलक वर्धा येथून बुटीबोरीकडे निघाले आहेत. रॅलीत हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मेंढपाळ बांधवांचा सहभाग आहे. आंदोलनासाठी अन्नसामुग्रीची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. सोलापूरहून २० हजार भाकऱ्या, मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा, नाशिकहून कांदा व भाजीपाला, लातूरहून तूरडाळ, तसेच इतर भागांतून हुरडा व अन्नधान्य नागपूरकडे रवाना झाले आहे.
दरम्यान आंदोलन दुपारी ४ वाजेपर्यंत नागपूर सीमेवर मंत्री यांची प्रतीक्षा करणार आहेत. राज्य शासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास हा ट्रॅक्टर मोर्चा मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान रामगिरीकडे कुच करणार आहे, अशी माहिती आंदोलकांनी दिली आहे.
गावोगावी चिवडा बनवण्याचे काम सुरू असून संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र या आंदोलनासाठी सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने आजवर शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. ना कर्जमाफी, ना हमीभाव- उलट केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. कापसाची आयात वाढल्याने देशांतर्गत भाव घसरले, तर सोयाबीनचा किमान आधारभूत भाव ५ हजार ३३५ रुपये असूनही शेतकऱ्यांना ५०० ते ३ हजार दरम्यानच विक्री करावी लागते, ‘हा कोणता आत्मनिर्भर भारत?’ असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
वर्धा मार्गावर वाहतूक व्यवस्थेत बदल
वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात आंदोलन होणार आहे. त्यामुळे वर्धेकडून येणारी वाहतूक जामठा चौकीवरून एनसीआयकडे वळवली. तेथून यू-टर्न घेऊन वाहने सिमेंट फॅक्टरी, डीपीएस स्कूल टी पॉईंटमार्गे उजवे वळण घेत मिहान डब्ल्यू बिल्डिंगवरून पुलाखाली उतरून इंडियन ऑईल कंपनी व खापरी पोलिस चौकीमार्गे नागपूरकडे जातील. खापरी पोलिस चौकीसमोरून डावे वळून सेझ मिहान पुलाच्या सर्विस रोडने, हॉटेल ले मेरीडियन व पांजरा गाव मार्गे आऊटर रिंगरोड पुलावरून उजवे वळण घेत वर्धेकडे जातील.
राज्यातील सर्व शेतकरी नेते एकत्र !
या आंदोलनाला राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. आंदोलनाच्या मंचावर विजय जावंधिया, वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), राजू शेट्टी (राष्ट्रीय अध्यक्ष, स्वामिनाथन शेतकरी संघटना), महादेव जानकर (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष), डॉ. अजित नवले (अखिल भारतीय किसान सभा), राजन क्षीरसागर (अखिल भारतीय किसान सभा प्रगत मंच), प्रकाश पोहरे (अध्यक्ष, किसान ब्रिगेड), दीपकभाई केदार (ऑल इंडिया पँथर सेना), प्रशांत डिक्कर (स्वराज्य पक्ष), विठ्ठलराजे पवार (शरद जोशी विचार मंच, शेतकरी संघटना) एकत्र येणार आहेत.
