अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत जे बोलले, ते हास्यास्पदही आहे आणि खरेही आहे. जेव्हा निवडणुका होतात, त्यावेळी अनेकांकडे मांत्रिक, तांत्रिकही येतात. आम्ही मंत्राद्वारे मतदार संघ बांधून देऊ, मतदान यंत्रे बांधून देऊ, आम्ही मतदारांवर प्रभाव टाकून देऊ, असा दावा ते करतात. हेच लोक शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे गेले असतील, अशी टीका भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
डॉ. बोंडे म्हणाले, निवडणूक काळात पैसे कमावणाऱ्या लोकांच्या टोळ्या फिरत असतात. शरद पवार यांचे तर राजकारणात संपूर्ण आयुष्य गेले आहे. त्यांच्याकडे तर मंत्र, तंत्राने बांधणारे, मतदान यंत्र हॅक करून देऊ, असे दावा करणारेही लोक आले असतील. पण, खरे तर जागरूक नेत्यांनी त्या लोकांची तत्काळ पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक होते. कारण अशी फसवेगिरी करणारे जे भामटे असतात, त्या भामट्यांना पकडणे हे खरे नेत्याचे काम आहे. पण, तेव्हा त्यांनी काहीच सांगितले नाही आणि आता दहा महिन्यानंतर राहुल गांधी यांच्या खोट्या आरोपांवर हो ला हो करण्यासाठी शरद पवार वक्तव्य देत आहेत.
डॉ. अनिल बोंडे म्हणाले, खऱ्या अर्थाने संजय राऊत यांना काहीही काम नाही. रात्री जेव्हा ते बसतात, त्यावेळी त्यांच्या डोक्यात ज्या कल्पना येतात. जे मनात विचार येतात, ते विचार सकाळी नऊ वाजताच्या भोंग्यातून समोर काढतात. त्यावर प्रसार माध्यमांमध्ये चर्चा केली जाते. रात्रीचे इफेक्ट हे सकाळी दिसतात. डॉ. अनिल बोंडे म्हणाले, मतदार याद्यांमध्ये ज्या चुका होतात, त्या दुरूस्त करण्यासाठी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी म्हणजेच एसआयआरची तरतूद निवडणूक आयोगाने केली आहे.
आज बिहारमध्ये ४८ लाख मते बाद करण्यात आली. त्यामुळे मतदार याद्यांची पडताळणी वारंवार झाली पाहिजे. राहुल गांधी एकीकडे म्हणतात, की महाराष्ट्रामध्ये मते वाढली. दुसरीकडे, मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण पण व्हायला नको, असेही ते सांगतात. एसआयआर पाठीमागे घ्या, अशी मागणी ते करतात. नेमके त्यांना काय पाहिजे आहे, हेच अजून स्पष्ट झालेले नाही. याच गोंधळात राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे संविधानिक संस्थांवर हल्ला करणे, निवडणूक आयोग, न्याय संस्थेला, ईडी, सीबीआयला बदनाम करायचे, हेच उद्योग सुरू आहेत.