बुलढाणा : जिल्ह्यातील एकूण ११ नगरपरिषदांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. ४ लाख ७६ हजार ८५५ मतदार ११ पालिकाचे अध्यक्ष आणि २८६ नगरसेवक निवडणार आहे.
मागील ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्यात आल्या. जिल्ह्यातील बुलढाणा,चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर नगरपरिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. पावणे पाच लाखावार मतदार रिंगणातील हजारो उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहे. ५० टक्के आरक्षणामुळे अर्धेअधिक सदस्य महिला राहणार आहे. तसेच अध्यक्ष पदाची पदे देखील महिलासाठी राखीव आहे. यामुळे कागदोपत्री का होईना पालिकात महिला राज राहणार आहे. तसेच मतदारा मध्येही महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे.
२ लाख ४२ हजार १०८ पुरुष मतदारांच्या तुलनेत २ लाख ३४ हजार ७२६ इतके महिलांचे मतदान आहे. तृतीयपंथीयांचे मतदान २१ आहे. १४१ प्रभाग मधून २८६ सदस्य निवडले जाणार आहे. त्यापैकी १४५ जागा स्त्रियांसाठी राखीव करण्यात आहेत.
ऑनलाईन नामांकन
उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करुन नगरपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. एका नोंदणीव्दारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येऊ शकणार आहे. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करुन ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहणार आहे. नामनिर्देशनपत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्विकारले जाणार आहे.
मतदारांना करावे लागणार किमान ३ मतदान
पावणे पाच लाख मतदारांना अध्यक्ष व सदस्य पदाकरिता मिळून तीन मतदान करावे लागणार आहे. १४१ पैकी बहुतेक प्रभाग दोन सदसयीय आहेत. मोजक्या ठिकाणीच तीन सदसयीय प्रभाग आहेत. तिथे मात्र मतदारांना चार मतदानचा हक्क राहणार आहे.
अध्यक्ष पदाचे आरक्षण
बुलढाणा, खामगाव, नांदुरा, लोणार नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आहे. देऊळगाव राजा नगर परिषदेचे अनुसूचित जाती मधील महिलांसाठी तर मलकापूर ओबीसी प्रवर्गातीसाठी आहे. शेगाव आणि जळगाव जामोद नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी आहे. शेगाव मध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना संधी मिळाली आहे.सिंदखेडराजा, मेहकर आणि चिखली नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आहे.
नियंत्रण कक्ष
आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचे हेल्प लाईन क्रमांक १९५०,१०७७ आणि ०७२६२-२४२६८३ हे आहेत.
