नागपूर: दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाला. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ह्युंदाई कारमध्ये हा स्फोट झाला. या घटनेतील जखमींना जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेतील मृतांची आणि जखमींची नावं समोर आली आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कठोर शब्दांत टीका केलेली आहे. काय म्हणाले गडकरी पाहूया.
“आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. बाधितांना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. तर, “दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाची बातमी खूपच दुःखद आणि चिंताजनक आहे. या दुःखद अपघातात अनेक निष्पाप जीव गमावल्याने दुःख झालं आहे. या दुःखद काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या कुटुंबांबरोबर मी आहे आणि माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी मी आशा करतो”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
काय म्हणाले गडकरी?
दिल्लीमधील ही दुर्दैवी घटना आहे. सरकारने याला गंभीरतेने घेतलेले आहे. अशा पद्धतीची कृती करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. दहशतवादाला समर्थन करणाऱ्यांना या देशात कुठली जागा नाही. सर्वांनी याचा धिक्कार केला पाहिजे. निरअपराध लोकांचा जो मृत्यू झाला. त्यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही गडकरी म्हणाले.
