नागपूर: नागपुरात स्कूलबसमध्ये अपघातात शालेय विद्यार्थ्यासह बस चालकाचा मृत्यूची घटना ताजी असतांनाच एका कॉलेज कॅम्पसमध्ये चक्क कारमध्ये बसून स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर शहरातील जी. एच. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी बीएमडब्ल्यू कारने धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कॉलेज कॅम्पसमध्ये हा प्रकार घडला असून, वाहनावर नंबर प्लेट नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. घटनेनंतर कॉलेज प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
स्टंटबाजीदरम्यान कार अतिवेगाने वळविणे, अचानक ब्रेक मारणे आणि धोकादायक पद्धतीने फिरविण्याचे दृश्ये व्हिडिओत दिसून येतात. विद्यार्थी आनंदात आरोळ्या ठोकत असताना सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. अशा प्रकारच्या स्टंटबाजीमुळे एखादा अपघात घडला असता, तर शेकडो विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आले असते, अशी चिंता पालकांमध्ये व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर नागपुरात नुकत्याच झालेल्या मानकापूर येथील शाळकरी बस अपघाताची आठवण ताजी झाली आहे. बेपर्वाई आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यामुळे अनेक वेळा निष्पाप विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येतात. मानकापूरच्या बस अपघातात दोघांचा मृत्यू आणि बरेच विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर विद्यार्थ्यांची स्थिती पाहून संपूर्ण नागपूर हादरले होते. तरीही काही विद्यार्थी आणि संस्थांकडून अशा प्रकारची बेफिकीर कृत्ये सुरुच आहेत, हे गंभीर आहे.
नागपूर पोलिसांची भूमिका काय ?
नागपुरातील कार स्टंटच्या घटनेमुळे शहरात चर्चा रंगली असून, शिक्षणसंस्थांमधील शिस्त व जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. शैक्षणिक परिसरात होणारी स्टंटबाजी ही केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, भविष्यातील गंभीर अपघातांना आमंत्रण ठरू शकते, असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी धोकादायक रोमांचाऐवजी शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदारीचे धडे घ्यावेत, असे आवाहन होत असून, पोलिसांची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाहतूक पोलिसांचे म्हणणे काय ?
नागपूर पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की अशा प्रकारच्या प्रकरणांत केवळ वाहनचालक नव्हे तर कॉलेज प्रशासनावरही कारवाई केली जाईल. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कठोर दंड आकारण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोकादायक असे कोणतेही वर्तन सहन केले जाणार नाही,” असे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.