अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा येथे तांत्रिक कामांमुळे काही गाड्या दोन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल केला असून नियोजित वेळेपेक्षा त्या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.मध्य रेल्वे मार्गावरील पाचोरा येथे ‘यार्ड रीमॉडेलिंग’चे काम केले जाणार आहे. ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन इंटरलॉकिंग’ कामासाठी ‘ब्लॉक’ घेण्यात येत आहेत. या कामामुळे १ व ४ फेब्रुवारीला गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा – नाशिक एक्सप्रेस, गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक – बडनेरा एक्सप्रेस, गाडी क्रमांक ११११३ देवळाली – भुसावळ एक्सप्रेस, गाडी क्रमांक ११११४ भुसावळ – देवळाली एक्सप्रेस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ४ फेब्रुवारीला गाडी क्रमांक १२८५९ मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस मुंबई येथून ०२.०० तास उशिराने सुटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडी क्रमांक २२१२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या कॅट एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०२.०० तास उशिराने सुटेल. गाडी क्रमांक १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ तास उशिराने सुटणार आहे. ही कामे पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

आनंदवार्ता! अमरावती – मुंबई एक्सप्रेसला अतिरिक्त डब्बे

अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२११२/१२१११) मध्ये वातानुकूलित द्वितीय श्रेणी आणि शयनयान श्रेणीचे प्रत्येकी एक डब्बा कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावती-मुंबई एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असतो. हे लक्षात घेऊन त्याला दोन अतिरिक्त डब्बे जोडले जात आहेत. अमरावती येथून १० फेब्रुवारी, तर मुंबई येथून ११ फेब्रुवारीपासून गाडीला अतिरिक्त डब्बे जोडले जाणार आहेत. एक प्रथम वातानुकूलित कम वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित द्वितीय, सहा वातानुकूलित तृतीय, सहा शयनयान, चार सामान्य वर्गासह १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार अशी गाडीची संरचना राहणार आहे. आता या गाडीला २२ डब्बे असतील. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांनी नव्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि गाडीच्या तिकिटांची स्थिती तपासावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway due to technical work at pachora some trains are canceled and others timings changed ppd 88 sud 02