नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरीचा मुद्या खुप  गाजला, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहत आहे, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगरपंचायतीच्या मतदार यादीतील घोळ  उघड झाला आहे. एकाच पत्त्यावर दोनशे मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचे  उघड झाले आहे. एकूणच राज्यातील स्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटले. यासंदर्भात नागपुरात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

बावनकुळे म्हणाले “ निवड्णूक आयोगाकडे जाणे हा विरोधी पक्षाचा अधिकारच आहे. आतापासूनच ते पराभूत मानसिकतेत गेले आहे.  निवडणूक आयोगाकडे आम्हीही गेलो होतो. आक्षेप घेतले होते. आक्षेप घेतले तरी  आम्हाला काही अडचण  नाही आम्ही  आमचे काम करू. ”  बावनकुळे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विरोधकांनी आक्षेप घेतले तरी काही होणार नाही असे त्यांना म्हणायचे आहे का ? आम्ही आमचे काम करू म्हणजे नेमके काय ? असा सवाल केला जात आहे.

महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेत तीन आणि पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य नियुक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीशी बोलताना केली. मुख्यमंत्री मान्य करतील, असा विश्वासही त्यांनी ्यक्त केला.  नागपूर जिल्हा परिषदेसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बावनकुळे यांनी स्वीकृत सदस्य नियुक्तीचा मुद्दा पुढे केला आहे. आरक्षणामुळे भाजपमधील अनेक इच्छुकांचे जिल्हा परिषद निवडणूक लढण्याचे स्वप्नभंमग झाले आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी तर बावनकुळे यांनी स्वीकृत सदस्य नियुक्तीचा मुद्दा पुढे केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोतवालांच्या मागण्यांवर तोडगा १६ ऑक्टोबरला

राज्यातील कोतवालांच्या मागण्यांवर १६ ऑक्टोबरला तोडगा निघणार असल्याच बावनकुळे म्हणाले. ३६ दिवसांपासून कोतवालांचे आंदोलन सुरु आहे. राज्यात चतुर्थश्रेणी पदनाम बंद करण्यात आले असल्याने ती मागणी पूर्ण करता येणार नाही. मात्र, कोतवालांच्या इतर न्याय्य मागण्यांचा विचार करून त्या १६ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत त्यांचे प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले.

काँग्रेसवर टीका सायन्स सेंटरच्या नावाबाबत काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ‘लायन्स सेंटर’ हे नाव आधुनिक आणि विकसित भारताचं प्रतीक आहे. नेहरू सेंटर का नाही दिलं यावर वाद घालण्यात अर्थ नाही; नावापेक्षा काम महत्त्वाचं आहे, असा टोला त्यांनी लगावला.