नागपूर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत २ सप्टेबरला काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी संतापले आहे. मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठीच हा निर्णय फडणवीस सरकारने घेतला, अशी भावना ओबीसी संघटनांची झाली आहे. शुक्रवारी या शासन निर्णयाविरोधात ओबीसीचा भव्य मोर्चा निघाला व शासन निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली. राज्य शासनाने काढलेला आदेश हा हैदराबाद गॅझेटपुरता मर्यादित असून ओबीसींची माथी भडकवून संभ्रम निर्माण करू नये, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री व मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

ते म्हणाले, सरकारने जीआर काढताना कोणतीही कुणबी व्यक्ती ओबीसी आरक्षणापासून वंचित राहू नये ही काळजी घेतली आहे. सरकार ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र हेतू लक्षात न घेता संपूर्ण महाराष्ट्रात या निर्णयाविरुद्ध आकांडतांडव करून महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, असा संभ्रम निर्माण केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसी समाजाच्या संपूर्ण रक्षणासाठी अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी शिष्टमंडळाला ओबीसींच्या आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

​उध्दव ठाकरेंच्या मराठवाड्यात निघणाऱ्या हंबरडा मोर्च्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, “ज्यांनी मराठवाड्याच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष करून निजामासारखे व्यवहार केले; ते आता विकासाच्या गप्पा मारत आहेत.आमचे महायुती सरकार केवळ नावे बदलत नाही, तर मराठवाड्याला विकासात अग्रस्थानी आणण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. महायुती सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी मात्र मराठवाड्यावर निजामासारखा अन्याय केला आणि या भागाला विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. आम्ही केवळ शहरांची नावे बदलली नाहीत, तर मराठवाड्याच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.” बावनकुळे म्हणाले, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती म्हणून कशी तयारी करायची, जागावाटप कसे सांभाळायचे, यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या पातळीवर तसेच जिल्हा समित्यांमध्ये चर्चा सुरू आहे.”