लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये महाराजांची शिवजयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी परवानगी घेण्याची गरज पडू नये, यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार करावा, असा प्रस्ताव राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावावर काल गुरूवारी सायंकाळी भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील राजदूत आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे प्रमुख विशाल शर्मा यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारतीय पुरातत्व खात्याचे अतिरिक्त महासंचालक जान्विज शर्मा, भारतीय पुरातत्व खात्याच्या क्षेत्रीय संचालक डॉ. टी. श्रीलक्ष्मी, अधीक्षक शुभी मुजुमदार, राज्याचे पुरातत्व संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले आणि इतर केंद्रीय व राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा- ‘ते’ दोघे एकत्र आले, पण संवाद न साधताच निघून गेले…

या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रा येथील दिवाण-ए-खास येथे दरवर्षी शिवजयंती साजरी करणार असल्याचे सांगितले. परंतु, त्याचवेळी याठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगीही घ्यावी लागते हा मुद्दा उपस्थित केला. केंद्र व राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाने एक सामंजस्य करार करून या उत्सवासाठी कायमस्वरुपी परवानगीचा निर्णय घेतल्यास ही समस्या सुटू शकते, असेही त्यांनी म्हटले. मुनगंटीवार यांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांसह केंद्र व राज्याच्या पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच यासंदर्भात पुढील पाऊल उचलण्यात येणार आहे.

या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ प्रमुख किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी युनेस्कोकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची सद्यस्थिती व पुढील कार्यवाही यासंदर्भात विशाल शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे हा भारतीय संस्कृतीचा गौरव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

आणखी वाचा- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आंबेडकरी समाजातून नाराजीचे सूर, काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले…

मुनगंटीवार सर्वांत सक्रिय मंत्री – मुख्यमंत्री

‘सुधीर मुनगंटीवार राज्यातील सर्वांत सक्रिय मंत्र्यांपैकी एक आहेत. ते एखादे काम हाती घेतात तेव्हा चिकाटीने आणि जिद्दीने पूर्णत्वास नेतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगभरात पोहोचविण्यासाठी जे काम ते करीत आहेत, ते कौतुकास्पद आहे. मी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि राहील,’ या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुनगंटीवार यांचे कौतुक केले. आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला होता. त्याच ठिकाणी मुनगंटीवारांनी राज्याभिषेक सोहळा साजरा केला, याचा अभिमान आहे. आता याचठिकाणी दरवर्षी शिवजयंती साजरी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji maharajs birth anniversary will now be celebrated every year in the diwan e khas of agra fort rsj 74 mrj