नागपूर : यवतमाळच्या बेंभळा धरणावरील दाभा परिसरात एक मोठा पक्षी निपचित अवस्थेत पडून नागरिकांना आढळला. त्यांनी लगेच याची माहिती यवतमाळतील मानद वन्यजीव रक्षक श्याम जोशी यांना दिली. वेळ न घालवता यवतमाळ वनविभागाचे शिंदे व मानद वन्यजीव रक्षक जोशी घटनास्थळी दाखल झाल्यावर सदर पक्षी हा दुर्मिळ व इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (IUCN) च्या लाल यादीत समाविष्ट असून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले लांब चोचीचे गिधाड( long billed vulture) असल्याचे व त्यावर जी पी एस ट्रान्समीटर व पायात रिंग बसविल्याचे निर्देशनास आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घटनेची माहिती यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकारी गावंडे यांना देण्यात आली व सदर पक्षी हा कमजोर अवस्थेत असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी यवतमाळ व श्याम जोशी यांनी वर्धा येथील पीपल फॉर एनिमल्स वन्यजीव बचाव केंद्रात हलविले. पीपल फॉर ॲनिमल्स वन्यजीव बचाव केंद्रातील वन्यजीव विभाग प्रमुख कौस्तुभ गावंडे यांनी सदर गिधाडाची पाहणी केली असता त्याच्या पायावर  लावलेल्या रिंग व जी पी एस ट्रान्समीटर बद्दल बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे जीवशास्त्रज्ञ मनन माधव यांना दिली व त्याच्या पायातील रिंग क्रमांकावरून त्यांनी सदर गिधाड हे महाराष्ट्रातील नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्प व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या माध्यमातून गिधाडांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत निसर्गात सोडण्यात आलेल्या दहा गिधाडांपैकी हे एक असल्याचे स्पष्ट केले.

हे ही वाचा…राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत नागपूरचे वर्चस्व, सहा सुवर्णपदकांसह….

सदर वन्यजीव बचाव केंद्रात दाखल केलेल्या गिधाडाच्या प्रकृतीची चाचणी येथील पशुवैद्यकीय अधिकरी रोहित थोटा यांनी केली असता त्याला किरकोळ विषबाधा व अतिसार असल्याचे निर्देशनास आले व त्यावर आठ दिवस उपचार व देखभाल करण्यात आली. त्याठिकाणी ऋषिकेश गोडसे यांनी त्याच्या देखभालीची व आहाराची काळजी घेतली व त्याला आहारात मांस देण्यात आले व पंखात उडण्याकरिता बळ येतपर्यंत विशेष काळजी घेण्यात आली. सदर गिधाड हे पीपल फॉर एनिमल्सच्या वन्यजीव बचाव केंद्रात उपचार घेत असल्याची माहिती उपवनसंरक्षक वर्धा, उपवनसंरक्षक यवतमाळ व उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प व बीएनएचएसचे डॉ. काजवीन यांना देण्यात आली.

हे ही वाचा…अखेर ‘तो’ वादग्रस्त सहायक पोलीस उपनिरीक्षक निलंबित, काय घडले?

यवतमाळ येथून वाचविण्यात आलेल्या गिधाडाला १८ सप्टेंबरला उपवनसंरक्षक श्री वायभासे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल फॉर ॲनिमल्स वन्यजीव बचाव केंद्रातील संचालक आशिष गोस्वामी व चमू त्याच प्रमाणे मानद वन्यजीव रक्षक श्री श्याम जोशी कोब्रा ऍडव्हेंचरचे स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे बेंभाळ परिसरात निसर्ग मुक्त करताना आपल्या भल्या मोठ्या पंखांनी भरारी घेत गिधाड संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकला जणू धन्यवाद देत निरोप घेतला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens found a large bird lying in a dead state in dabha area on bembhala dam of yavatmal rgc76 sud 02