नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरलेला सहायक पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ पाटील याला एका एमडी तस्कराकडून वसुली करणे चांगलेच अंगलट आले. पोलीस आयुक्तांनी त्याला सेवेतून निलंबित केले असून प्राथमिक चौकशीच्या अहवालानंतर त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे अनेक वसुलीबाज कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ पाटील हा पोलीस खात्यात गेल्या अनेक वर्षांपासून वसुली कर्मचारी म्हणून वादात होता. तो अमली पदार्थ विरोधी पथकामध्ये कार्यरत होता. गांजा आणि ड्रग्स घेणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी हा त्यांच्याकडून पैसे वसुली करून आरोपींना सोडून देत होता. त्यांच्या कुटुंबियांनाही गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे वसूल करीत होता. गेल्या २० ऑगस्टला अमली पदार्थ विरोधी पथकाने गोपनीय माहितीवरुन कपील गंगाधर खोब्रागडे, राकेश अनंत गिरी, अक्षय बंडू वंजारी या तिघांना ९० लाख रुपयांच्या एमडीसह अटक केली होती.

हे ही वाचा…नागपूर :‘ॲडव्होकेट अकॅडमी’ला शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी, भूमीपूजनच्या आधीच…

या प्रकरणात अन्य सहकारी मकसूद मलिक (टेकानाका), सोहेल खान (सारंगपूर-मध्यप्रदेश), गोलू बोरकर (हिवरीनगर), अक्षय वंजारी (हिंगणा) आणि अल्लारखा खान यांची नावे समोर आली होती. तपासात अक्षय वंजारी आणि गोलू बोरकर यांच्यात ऑनलाईन पैशाचा व्यवहार होता. मात्र, तो व्यवहार त्यांचा खासगी कामासाठी होता. त्या पैशाचा एमडी विक्री-खरेदीशी संबंध नव्हता. पोलिसांनी गोलूला अटक करण्याची तयारी सुरु केली. त्यादरम्यान, सिद्धार्थ पाटील याने गोलूला सतर्क केले. त्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गुन्ह्यात अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून गोलू बोरकर याने ७० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्याने गोलूला शहर सोडून एका महिन्यासाठी बाहेर राहण्यास सांगितले.

हे ही वाचा…नागपूर : वाघाच्या जेरबंदीवरून वनखाते अडचणीत? नियमांचे उल्लंघन…

वृद्ध मातेची आयुक्ताकडे तक्रार

गोलू बोरकर याचा गुन्ह्याशी काहीही संबंध नसताना पोलीस कर्मचारी सिद्धार्थ पाटील याने ७० हजार रुपये वसूल केले. त्या पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी गोलूला वृद्ध मातेच्या गळ्यातील दागिने विकावे लागले. चार घरची धुणी-भांडी करुन वृद्धेने दागिने केले होते. मात्र, पोलिसांनी पैशाची मागणी केल्याने दागिने विकावे लागल्याची खंत वृद्धेला होती. त्यामुळे वृद्धेने थेट पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांची भेट घेतली. त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी चौकशी केली असता सिद्धार्थ पाटीलने पैसे घेतल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला ताबडतोब निलंबित करण्यात आले.

हे ही वाचा…गोंदिया : हातात फलक, डोळ्यात राग; बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जनआक्रोश…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंगाजमुनातील वसुलीमु‌ळे आला होता चर्चेत

सहायक पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ पाटील हा लकडगंज पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याने गंजाजमुनात एका आंबटशौकीन शेतकऱ्याला पकडले होते. त्याच्या खिशात शेतमाल विक्रीचे ३५ हजार रुपये होते. पाटीलने त्याचे पैसे हिसकावून घेतले आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा केली होती. ही बाब तत्कालीन आयुक्त दीक्षित यांच्यापर्यंत पोहचली होती. त्यांनी पाटीलची लगेच मुख्यालयात बदली होती.