बुलढाणा: शांततेत आणि पारंपरिक उत्साहात पार पडलेल्या गणेशोत्सवाला अखेर विसर्जनाच्या दिवशी गालबोट लागले! जळगाव जामोद आणि संत नगरी शेगाव येथील विसर्जन दरम्यान दोन गटात संघर्ष पहावयास मिळाला आणि दगडफेक झाली. यापरिनामी जळगाव येथील विसर्जन काल रात्रभर रखडले तर शेगाव येथील गणेश विसर्जन काल रात्री पार पडले. जळगाव मध्ये अखेर आज बुधवारी दुपारी मिरवणुकांना सुरुवात झाली. दुसरीकडे एका ‘बँड पार्टी’चे वाहनाला अपघात होऊन एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. दुसरीकडे विसर्जन करताना एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव ला गालबोट लागले असतांनाच काही ठिकाणी शोक कळा देखील पसरली आहे.

काल मंगळवारी ,१७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उशिरा जिल्ह्याभरात गणेश विसर्जन मिरवणुकांना उत्साहात आणि थाटात प्रारंभ झाला. तेरा पैकी अकरा तालुक्यातील मिरवणुका आणि विसर्जन रात्री उशिरापर्यंत शांततेत आणि संयमाने पार पडले. याला जळगाव जामोद आणि विदर्भ पंढरी शेगाव नगरी येथील विसर्जन अपवाद ठरले.

हे ही वाचा…अमरावती : बॅनर फाडण्‍याच्‍या कारणावरून अचलपुरात दोन गटांत हाणामारी, दगडफेकीमुळे तणाव

दगडफेक आणि तणाव

जळगाव जामोद येथील गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जळगाव जामोद शहरातील वायली वेस भागात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याचे एका गटाने सांगितले. यामुळे मिरवणूक मार्ग आणि गावात तणाव निर्माण झाला .काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे तेथील गणेश मंडळांनी गणपती जागेवरच ठेवत जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन करणार नाही अशी रोखठोक भूमिका घेतली. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. दंगाकाबू पथक सह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जळगाव जामोद मध्ये तैनात करण्यात आला.मिरवणुकीवर कथित दगडफेकीच्या पोस्ट समाज माध्यम वर सार्वत्रिक झाल्याने शहरातील तणावात भर पडली. यामुळे रात्रभर रखडलेले विसर्जन आज सकाळी देखील तसेच होते. दरम्यान आज दुपारी साडेबारा वाजेनंतर मिरवणुकांना प्रारंभ झाला. शेगावात दोन तास विसर्जन रखडले दरम्यान शेगाव येथेही काल रात्री संघर्ष निर्माण झाल्याने विसर्जन मिरवणुका दोन तास रखडल्या. गणेश मंडळांनी विसर्जन मार्गावर ठिय्या मांडला.

शहीद अब्दुल हमीद चौक परिसरात दगडफेक

एका मंडळातील काही कार्यकर्त्यांनी शहीद अब्दुल हमीद चौक परिसरातील एका फलकावर गुलाल टाकल्यावरून वाद उफाळून आला. काही वेळातच या परिसरातून दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मंडळ पुढे नेणार नसल्याचा पवित्र घेण्यात आला. या परिसरात दोन तास शहरातील सर्वच मंडळ अडकून पडले होते . मात्र पोलीस आणि काही मंडळींच्या मध्यस्थी नंतर मिरवणूक पुन्हा सुरू झाली. रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. आज बुधवारी देखील शेगाव शहरात तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा…सुवर्णवार्ता… गणेशोत्सव संपताच सोन्याच्या दरात घसरण.. हे आहेत आजचे दर…

तरुणाचा तलावात बुडून मृत्यू!

दरम्यान लोणार तालुक्यातील गोत्रा येथे काल रात्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून गेले मृत्यू झाला. अक्षय मसुरकर (१८) असे तरुणाचे नाव आहे. तो मामाच्या गावी देऊळगाव वायसा येथे रहायला होता आणि लोणी येथे बारावीत शिकत होता.प्राप्त माहितीनुसार अक्षयला पोहता येत नव्हते. गणेश विसर्जनासाठी मित्रांसोबत तो गोत्रा येथील तलावावर गेला होता .तलावावर रात्री अंधार असल्याने ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही. रात्री विसर्जन करून सर्व मित्र घरी आले त्यावेळी अक्षय सोबत दिसत नव्हता. सगळीकडे त्याचा शोध घेऊन तो मिळून न आल्याने गोत्रा येथील तलावात शोध घेण्यात आला. आज बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी सकाळी अक्षयचा मृतदेहच सापडला. घटनास्थळी पोलीस पोहचले असून पंचनामा करण्यात आला.

हे ही वाचा…नागपूर : राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा महाराष्ट्रात… बावनकुळेंचा इशारा

विसर्जनसाठी जाणारे वाहन उलटले; एकाचा मृत्यू

दरम्यान चिखली तालुक्यातील अमडापूर जवळ झालेल्या वाहन अपघातात बँड पार्टीचे वाहन उलटले .या अपघातात एक जण ठार तर पाच इसम जखमी झाले. ही घटना काल मंगळवारी ,१७ सप्टेंबरला संध्याकाळी उशिरा घडली. प्राप्त माहितीनुसार अकोला येथील भारत बँड पार्टीचे वाहन चिखली येथे विसर्जन मिरवणुकीसाठी जात होती. अमडापूर चिखली रस्त्यावर ४०७ वाहनाचे टायर फुटल्याने वाहन भर वेगात उलटले . यामुळे डोक्याला मार लागल्याने एका वादकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.