चंद्रपूर : जिल्हा बँकेतील नोकरभरतीची सर्वंकष चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेत दिल्यानंतर भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन उपोषणाची सांगता केली. मागील १४ दिवसांपासून पोतराजे यांचे आमरण उपोषण सुरू होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारदेखील करावे लागले होते. जिल्हा बँकेतील नोकरभरती रद्द करावी तसेच आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी आरक्षण बचाव संघर्ष समितीने २ जानेवारीपासून आंदोलन सुरू केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१६ जानेवारीपासून मनोज पोतराजे, तर २१ जानेवारीपासून रमेश काळबांडे आमरण उपोषणाला बसले होते. या नोकरभरती प्रकरणाची उच्चस्तरीयच चौकशी करावी, या मागणीसाठी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले. पोतराजे यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारी पोतराजे यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला व सविस्तर चर्चा केली. नोकर भरतीच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. भरतीप्रक्रियेत जी अनियमितता झाली, त्याचीही चौकशी होईल. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यानंतर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पोतराजे आणि काळबांडे यांनी उपोषण सोडले.

 ‘ईडी’कडूनही चौकशी!

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ पदांच्या भरतीप्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, आदित्य नंदनवार आणि रोहन गुजेवार यांनी थेट नवी दिल्ली गाठून सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात तक्रार दाखल केली.

कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

बँकेतील भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांचे (एससी, एसटी, ओबीसी व महिला) आरक्षण काढून टाकण्यात आले आहे. ३१ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांपैकी केवळ तीन जिल्ह्यांतील (चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ) उमेदवारांची निवड करण्यात आली. याशिवाय निवड झालेले उमेदवार बँकेशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे. या प्रक्रियेत कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही आपने केला आहे.

अधिकारी म्हणाले, कठोर कारवाई करणार

यासंदर्भात आपच्या शिष्टमंडळाने ‘ईडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आणि अपारदर्शक आहे. चंद्रपूरच्या सामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. भरतीप्रक्रियेची चौकशी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच ठेवू. भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आंदोलन करू. पीडित बेरोजगारांनी आपशी संपर्क साधावा, असे आवाहन राईकवार यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis assurance investigation into recruitment in chandrapur district cooperative bank rsj 74 zws