लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यातील तीन जागांपैकी दोन ठिकाणी भाजपने, तर एका ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक यांनी विजयी चौकार मारला आहे. वाशीम व कारंजा मतदारसंघातील भाजपच्या नव्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिली.

वाशीम जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या पारड्यात दोन, तर मविआला एका जागेवर कौल दिला. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव वाशीम मतदारसंघात भाजप व शिवसेना ठाकरे गटात थेट लढत झाली.या मतदारसंघात भाजपने भाकरी फिरवत श्याम खोडे यांना उमेदवारी दिली. त्यांनी पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही.

आणखी वाचा-काटोलमधील देशमुख पर्व संपुष्टात, सावनेरमध्ये उदय

निवडणुकीमध्ये भाजपचे खोडे यांना एक लाख २२ हजार ९१४, त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाचे डॉ. सिद्धार्थ देवळे यांना एक लाख ०३ हजार ०४० मते मिळाली. वंचितच्या मेघा डोंगरे यांना नऊ हजार २६४ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपने शिवसेना ठाकरे गटावर १९ हजार ८७४ मतांनी विजय मिळवला. रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे. या मतदारसंघात माजी खासदार तथा माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी केली.

आणखी वाचा-‘टायगर अभी जिंदा है’! मुनगंटीवार म्हणाले होते, ‘मैं चुनाव हारा हूं, हिम्मत नही’

या बंडखोरीला भाजपचे पाठबळ असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटातून झाला. त्यावरून महायुतीमध्ये कुरबुरी सुरू होती. रिसोड मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, तो चुकीचा ठरला आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अमित झनक यांना ७६ हजार ८०९, अपक्ष अनंतराव देशमुखांना ७० हजार ६७३ व शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळींना ६० हजार ६९३ मते मिळाली. अमित झनक यांनी सहा हजार १३६ मतांनी विजय मिळवला. कारंजा मतदारसंघामध्ये भाजपने यश मिळवले आहे.

या मतदारसंघात मतमोजणी अतिशय संथगतीने सुरू आहे. २४ व्या फेरी अखेर भाजपच्या सई डहाके यांनी ३२ हजार ३३६ मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. सई डहाके यांना ७७ हजार ४४८, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्ञायक पाटणी ४५ हजार ११२, एआयएमआयएमचे युसुफ पुंजानी ३० हजार ३७० व वंचितचे सुनील धाबेकर यांना २३ हजार ५४८ मते २४ व्या फेरी अखेर मिळाली होती

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress amit zanak wins for fourth time in risod constituency ppd 88 mrj