नागपूर: काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. दरम्यान वडेट्टीवार यांनी राजकीय सूडबुद्धीतन ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नागपुरात मोठ्या मेळाव्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आयकर नोटीस बजावण्यात आली, लोकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी सरकार त्यांच्या एजन्सींचा गैरवापर करत आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी सोमवारी गडचिरोली येथे एका काँग्रेस कार्यक्रमात बोलताना केला.

“ही नोटीस म्हणजे ओबीसी आणि सामान्य लोकांच्या हक्कांसाठी उभे राहणाऱ्यांना धमकावण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे. पण आम्ही गप्प बसणार नाही. शेतकरी, आदिवासी आणि कामगार वर्गाच्या न्यायासाठी आम्ही लढत राहू,” असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत गडचिरोलीतील अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी (सपा) आणि शिवसेनेतील नेते गडचिरोली नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश सावकर पो-रेड्डीवार, कविता पोरेड्डीवार, विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद सदस्य लालसू पोगती आणि शिवसेनेचे गजानन नईअम यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गडचिरोलीतील या पक्षांतराला “राजकीय समीकरणे बदलणारा क्षण” म्हणत वडेट्टीवार यांनी सत्ताधारी यंत्रणेवर समाजात फूट पाडण्याचा आरोप केला. “राजकीय फायद्यासाठी लोकांना विभागण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आमचा लढा हा भारताच्या विविधतेत एकतेच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आहे,” असे ते म्हणाले.

कृषी संकटावरही त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. “पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीशिवाय जगावे लागत आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांच्या एलआयसी बचतीचा वापर करून त्यांच्या उद्योगपती मित्रांना मदत करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

सपकाळ यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकरी आणि आदिवासींच्या हितापेक्षा उद्योगपतींच्या फायद्याला प्राधान्य देत आहे.” गडचिरोलीतील जमीन नियमांमध्ये उद्योगपतींना फायदा होईल अशा सुधारणा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याच्या लोकांपेक्षा येथे असलेल्या खनिज संपत्तीत जास्त रस आहे,” असे सपकाळ म्हणाले.

पोरेड्डीवार आणि पोगती यांच्या प्रवेशामुळे “गडचिरोलीमध्ये काँग्रेसला मोठी ताकद मिळेल,” असे सांगून सपकाळ यांनी विश्वास व्यक्त केला की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस “जिल्ह्यात आपला झेंडा फडकवेल.”