नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहिरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसने राज्य निवडणूक अधिकारी यांना पत्र पाठवून तक्रार केली आहे. पत्रात अतुल लोंढे म्हणतात, निवडणूक आयोगाच्या २९ डिसेंबर २०१५ नुसार निवडणूक प्रचारासाठी सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांच्या मालमत्तांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र सर्व राज्यांचे कॅबिनेट सचिव, मुख्य सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उद्देशून पाठवलेले आहे. बंदी असतानाही एसटीच्या अधिकाऱ्यांनी १००० हून अधिक बसेस शिवसेना उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी अवैधपणे वापरास परवानगी दिली आहे.

हेही वाचा…यवतमाळ : शिवसेना (उबाठा)चे संजय देशमुखांवर खोटी माहिती दिल्याचा आरोप

एसटी महामंडळाच्या या बसेसवर शिवसेना बॅनर लावून निवडणूक प्रचार करत आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे छायाचित्र आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह स्पष्टपणे दाखवण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे हे कृत्य केवळ आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षता आणि अखंडतेला बाधा आणणारे आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा…संजय राऊत म्हणतात, ‘ती नाची, डान्‍सर, बबली….’

लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे, असे लोंढे यांनी लोकसत्ताला सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress said shiv sena advertise on msrtc buses violates code of conduct demands to election commission to cancellation of candidature rbt 74 psg