अकोला : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलेल व आरक्षण रद्द करेल, अशी अफवा काँग्रेसकडून सातत्याने पसरवली जाते. मात्र, संविधान कोणीही बदलू शकत नाही. भाजप असेपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द होणार नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. भाजपने १० वर्षांत बहुमताचा वापर दहशतवाद, कलम ३७०, तिहेरी तलाक, आदी हटविण्यासाठी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> “देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू, अशा पद्धतीची दडपशाही…” आमदार यशोमती ठाकूर यांचा भाजपवर आरोप

अकोला मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, डॉ. उपेंद्र कोठीकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. अमित शहा यांनी आपल्या भाषणात काँग्रेससह शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘इंडिया’ आघाडीचा राम मंदिराला विरोध होता. काँग्रेसने ७० वर्ष हा प्रश्न रेंगाळत ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षांत हा प्रश्न मार्गी लावून भव्य राम मंदिर उभारले. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था येईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> गडकरींच्या प्रचारात शाळकरी मुलांचा सहभाग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

काश्मीरचे महाराष्ट्रातील जनतेला काय देणे घेणे, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी केले. काश्मीरसाठी जीव देऊ शकतो, याची त्यांना कल्पना नाही. मोदींनी कलम ३७०, तिहेरी तलाक, दहशतवाद, महाराष्ट्रातील नक्षलवाद संपवण्याचे काम केले. काँग्रेसच्या सरकारमध्ये शरद पवार दहा वर्ष मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा प्रश्न निर्माण होतो. १० वर्षात काँग्रेसने एक लाख ९१ हजार कोटी दिले, तर मोदी सरकारने ७ लाख १५ हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या विकासासाठी दिले आहेत. पुत्रप्रेमात असलेल्या उद्धव ठाकरेंविषयी बोलणार नाही, असा टोला देखील शहा यांनी लगावला. महाराष्ट्रातील अर्धी शिवसेना व राष्ट्रवादी आणि त्यांच्यामुळे निम्म्यावर आलेले काँग्रेस विकास करू शकत नाही, अशी टीका अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर केली. दरम्यान, सभेमध्ये अवकाळी पावसाचा व्यत्यय आल्यानंतर ही मोठा जनसमुदाय उपस्थित होता.