नागपूर : राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडवणवीस यांच्याकडे गृहमंत्रालयाचाही कारभार आहे. मात्र त्यांचाच गृह जिल्हा असलेल्या नागपुरातील लाडक्या बहिणी शहरात सुरक्षित नसल्याचे वास्तव समोर येत आहे. शहरातल्या गुन्हेगारीला लगाम लागल्याचे दावे पोलीस आयुक्तालय करत असले तरी त्याला छेद देणाऱ्या घटना दररोज सातत्याने घडत आहेत.शहरातल्या महिला आणि मुली देखील सुरक्षित नसल्याचे या घटनांवरून सिद्ध होत आहे.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना तपासल्या तर हे वास्तव समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात दररोज ४ महिलांवर अत्याचाराच्या घटना पोलीस डायरीवर नोंदवल्या जात आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे स्त्री अत्याचाराशी निगडीत दाखल गुन्ह्यांची संख्या २०२२ च्या तुलनेत सातत्याने वाढत चालली आहे. २०२२मध्ये शहराच्या हद्दीत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या १२५९ घटनांची नोंद करून गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच्या पुढच्याच वर्षी २०२३मध्ये ही संख्या १५५६ पर्यंत वाढली. महिलांवर अत्याचार करणाऱ्या १५१३ प्रकरणांमध्ये पोलीसांनी २०२४मध्ये दुपटीहून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले. याच वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत महिलांवर अत्याचाराच्या ११३२ घटना पोलीस डायरीवर नोंदवून घेत गुन्हे दाखल करण्यात आले.

वर्षभरात ७४ तडीपार

वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होत नसल्याने जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या कालावधीत शहराच्या हद्दीतील ३४ पोलीस ठाण्यांमधून आलेल्या प्रस्तावाची दखल घेत पोलीस आयुक्तांनी ७४ गुंडांवर तडीपारीची कारवाई करत त्यांना शहरा आणि ग्रामीणच्या हद्दीतून ठराविक कालावधीसाठी हद्दपार केले. माहिती अधिकार स्वयंसेवक अभय कोलारकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून पोलीस आयुक्तालयाने ही आकडेवारी जारी केली आहे.

असे झाले मृत्यू

गुन्हा- वर्ष – २०२२-२०२३-२०२४
पाण्यात उडी घेऊन आत्महत्या- ४४-२०-२७
ज्येष्ठाचा बुडून मृत्यू- ८-७-२
दंगल प्रकरणात अटक- २९३-३७६-३७३
तडीपार- ७४-३९-९५