लोकसत्ता टीम

नागपूर : अभिनेते सलमान यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा तपास पोलीस करीत आहेत. त्याची माहिती मिळाली की दिली जाईल. मात्र या घटनेवरुन कायदा – सुव्यवस्था बिघडली असा अर्थ काढणे, चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दीक्षाभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाअभिवादन केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबद्दल फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, “झालेल्या हल्ल्याचा पोलीस तपास करीत आहे. या घटनेवरून विरोधकांकडून ज्या प्रकारे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची टीका केली जात आहे, ती योग्य नाही.”

आणखी वाचा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र

मोदींच्या ‘ चारशे पार ‘ या घोषणेतूनच संविधान बदलाचे षडयंत्र रचले जात असल्याचा वास यैतो, अशी टीका राष्ट्रवादीचे ( शरद पवार) जयंत पाटील यांनी केली होती, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे नैराश्यात गेलेले आहे त्यामुळे ते काहीही बोलतात. ते मनावर घेऊ नका, सेंट्रल हॉलमध्ये संविधान ठेवूनच सगळ्या पक्षांचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे फडणवीस म्हणाले.

संविधान बदलणार असे काही विरोधकांकडून बोलले जात आहे त्यात काही अर्थ नसून उलट काँग्रेसकडून संविधान बदलवण्यात आले आहे असेही फडणवीस म्हणाले.