लोकसत्ता टीम

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १९ एप्रिल रोजी तळेगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. वर्धेचे रामदास तडस व अमरावतीच्या नवनीत राणा या दोन उमेदवारांसाठी ही सभा होणार आहे. सभेची पूर्वतयारी म्हणून आमदार दादाराव केचे यांनी सभास्थळाचे कलश पूजन केले होते. संस्कृती व परंपरा यावर निस्सीम श्रद्धा ठेवून सर्व आखणी होत आहे. म्हणजेच, विवाहाप्रसंगी जशा मानसन्मान म्हणून अक्षता दिल्या जातात, तशाच अक्षता वाटपाचा विधी आज संध्याकाळी पार पडला.

या सभेचे नियोजन यथोचित व्हावे म्हणून उच्चस्तरावरून समिती गठीत झाली. क्षेत्रप्रचारक सुमित वानखेडे, भाजप जिल्हा महासचिव अविनाश देव व किशोर दिघे हे तिघे सभेच्या यशस्वीतेस जबाबदार राहणार. वानखेडे यांना सभास्थळी म्हणजे तळेगाव येथे पूर्णवेळ थांबून समन्वय साधायचा आहे. व्यासपीठ सुशोभीकरण, माईक व प्रक्षेपण, पत्रकार, व्ही.आई.पी. कक्ष, व्यासपीठावरील निमंत्रित, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची आतिथ्य व अन्य जबाबदाऱ्या आहेत. अविनाश देव हे वर्धा मुख्यालयी थांबून पासेस, सुरक्षा यंत्रणाशी समन्वय, वर्धेतून जाणाऱ्या गाड्या, पदाधिकारी संवाद, बाहेरून येणाऱ्या नेत्यांचे स्वागत, भोजन व तत्सम काम पाहणार.

आणखी वाचा-नागपुरात उन्हाच्या तडाख्यात दोन निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, झाले असे की…

किशोर दिघे हे प्रामुख्याने गर्दीचे नियोजन करणार. मी इतके आणले, सांगणाऱ्या नेत्याचा हिशेब ठेवणार. आर्वी वागळता उर्वरित विधानसभा क्षेत्रातून प्रत्येकी तीनशे गाड्या भरून आणण्याचे लक्ष्य आहे. येणाऱ्या गाड्या व त्यात येणारे समर्थक, ब्लॉक पातळीवरून येणारे, आर्वीतून जमा गर्दी, जमलेल्या वाहनांचे क्रमांक, त्याचे पैसे कोण देणार, पार्किंग, वाहनचालक व त्याची व्यवस्था, दुचाकीने येणारे, स्वयंस्फूर्त, सभेच्या कोणत्या भागात किती बसणार, महिलांची व्यवस्था, पेयजल पुरवठा, नारेबाजी, दुपट्टे उंचावणे, अशी व अन्य जबाबदारी देण्यात आली आहे.

या सभेत कुठेही उणीव राहू नये म्हणून हे तिघे रात्रभर वरिष्ठांच्या संपर्कात राहतील. सभेसाठी विशेष संपर्क यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे. त्याची रात्रभर उजळणी होणार. सुरक्षा अधिकारी वर्गाशी संवाद साधून कुठेही गडबड होवू नये म्हणून अपेक्षित दक्षता घेतल्या जात आहेत. सभेसाठी जिल्ह्याबाहेरून किती लोकं येणार हे आज रात्री निश्चित होईल.