नागपूर : मतचोरीवर छाती बडवण्यापेक्षा विरोधकांनी आपण का हरलो, जनतेने आपल्याला का नाकारले याचा अभ्यास करावा, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. तेव्हापासून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या आरोपाला प्रथम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिउत्तर देण्यात आले, त्यानंतर निवडणूक आयोगानेही राहुल गांधीचे आरोप फेटाळून लावर त्यांना प्रतिज्ञापत्रावर आरोप करण्याचे प्रतिआव्हान दिले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी बिहारमध्येही हाच मुद्या त्यांच्या प्रचार सभांमध्ये आक्रमकपणे मांडणे सुरू केले आहे. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही राहुल गांधीच्या सुरात सूर मिसळून त्यावर भाष्य केले आहे.

यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यात भाष्य करताना विरोधकांवर टीका केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मतचोरीवर भाष्य केले, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी ”गालिबने म्हंटले होते ‘दिल बहलाने के लिये खयाल अच्छा है’ असे उत्तर दिले. २०१४ मध्ये मोदी जिंकले, त्यापूर्वी तेव्हा काँग्रेसची देशात आणि राज्यात सत्ता होती. जोवर ते आपण का हरलो याचा विचार करणार नाही जनतेने आपल्याला का नाकारले आहे, याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचा काम करतील.. तोवर हे जिंकणार नाही. तोवर सर्व पक्षांची अवस्था अशीच राहील.

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी मोदींवर केलेली टीका आम्ही गांभीर्याने घेत नाही,असे ते म्हणाले.लाडकी बहीण योजनेचा सरकारी सेवेतील महिलांनी घेतलेल्या लाभाबद्दल चौकशी होत आहे.. चुकीचे लाभ घेणारे आहेत, त्यांचे लाभ बंद केले जाईल, असे ते म्हणाले. कोण भेटतो यावरुन युती ठरत नाही

राज ठाकरेनी घेतलेल्या भेटीबाबत फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांच्या भेटीने लोकांनी संभ्रमित होण्याचे कारण नाही,आमची महायुती अभेद्य आहे.आम्ही महायुती मध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण भेटतो यावरून युती ठरत नाही, यावरून राजकारण होत नसते,असे मुख्यमंत्री म्हणाले