नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. फडणवीस दिल्ली दौऱ्यावर कशासाठी गेले याबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांची मदतीसाठी शासनाने पॅकेज जाहीर केल्यावर फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातही फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पूरस्थितीबाबत पंतप्रधान मोदींसह केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली होती. फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले होते. आता ३१ हजार कोटी मदतीचा पॅकेज जाहीर झाल्यावरही फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. फडणवीस यांचा आताचा दौरा महाराष्ट्र राज्याशी संबंधित नसून येणाऱ्या बिहार निवडणुकीशी निगडित आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात स्वत: याबाबत माहिती दिली. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ही राज्याच्या राजकारणातील निर्णायक लढत ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मतदान दोन टप्प्यांत — ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार असून, मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (भाजप-जदयू) आणि महागठबंधन (राजद, काँग्रेस, डावे पक्ष) यांच्यात सरळ चुरस आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत असून, त्यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास टिकतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दुसरीकडे, तेजस्वी यादव यांनी तरुणांना रोजगार आणि सामाजिक न्यायाचे आश्वासन देत परिवर्तनाची लाट उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, तेजप्रताप यादव यांनी स्वतंत्र पक्ष ‘जनशक्ती जनता दल’ स्थापन केल्याने राजकीय समीकरणात नवा तिखटपणा आला आहे. विविध जातीय आणि प्रादेशिक समीकरणांबरोबरच तरुण मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. प्रचार मोहिमा जोरात असून, सोशल मीडियावरून नेतेमंडळी एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आहेत. निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार यादीत लाखो नव्या मतदारांची नोंदणी केली असून, स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुकीसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. परिणामी, बिहारमधील ही निवडणूक केवळ सत्तांतराची नव्हे तर नव्या राजकीय दिशा आणि नेतृत्वाच्या कसोटीची मानली जात आहे.
फडणवीसांचे काम काय?
बिहार निवडणुकीसाठी उमेदवार निश्चिती करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने संसदीय दलाची बैठक दिल्लीत आयोजित केली आहे. देवेंद्र फडणवीस हे या संसदीय दलाचे सदस्य आहेत. त्यामुळे या बैठकीत सहभागी होण्यासाठी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. या बैठकीत भाजप उमेदवारांसह प्रचाराची दिशा निश्चित करणार आहे. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होती.