बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील पावसाचे थैमान सप्टेंबर अखेरीसही कायम आहे. जिल्ह्याच्या घाटावरील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर व चिखली या तालुक्यात अधून मधून ढगफुटी सदृश्य पाऊस हजेरी लावून थैमान घालतोय. दोन दिवसापासून सार्वत्रिक पाऊस नसला तरी काही भागात कोसळधार पाऊस हजेरी लावत आहे. काल शुक्रवारी, १९ सप्टेंबर रोजी चिखली तालुक्यात असाच धोधो पाऊस बरसला.
चिखली तालुक्यात १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. पाहता पाहता पावसाने रौद्र स्वरूप धारण केले. मुसळधार पाऊस पडला. यापरिणामी नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील नाल्याला मोठा पूर आला.या नाल्याला आलेल्या पुरात शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग ( वय ७० वर्ष) हे पाय घसरून पडले. गावकऱ्यांच्या डोळ्या देखत ठेंग हे वाहून गेले.
खंडाळा मकरध्वज येथील गावकरी आणि युवकांनी लक्ष्मण ठेंग यांचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला . मात्र काल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा थांग पत्ता लागला नाही.
बचाव पथक वाटेतून…
या दुर्देवी घटनेची माहिती तहसीलदार चिखली यांना कळविण्यात आली . त्यांनी अधीनस्थ चमु आणि जिल्हाधिकारी कार्यलयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळविण्यात आली. रात्री अंधार व पावसामुळे शोध मोहीम थांबवावी लागली. दरम्यान जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, शोध पथक प्रमुख तारासिंग पवार यांच्या मार्गदर्शनात खंडाळा कडे आज सकाळीच जिल्हा बचाव व शोध टीम घटनास्थळाकडेरवाना झाली. मात्र त्यापूर्वीच लक्ष्मण ठेंग यांचा मृतदेह गावापासून दूर अंतरावर आढळून आला. यामुळे जिल्हा पथक अर्ध्या वाटेटूनच बुलढाणायाकडे माघारी फिरले.