नागपूर: कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्थानकाला आग लागली. त्यामुळे या मार्गावरची सेवा दुपारपर्यंत ठप्प होती. स्थानकावरील सौर पॅनलमध्ये शॉर्ट सक्रिट झाल्याने आग लागल्याचे महामेट्रोकडून सागण्यात आले. या घटनेचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

नागपुरात मेट्रो सध्या शहराच्या चारही भागात धाऊ लागली असून अतिशय सुरक्षित सेवा असल्याचा दावा महामेट्रोकडून वारंवार केला जातो. मेट्रोचे सर्व स्थानके कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आली असून तेथे सुरक्षेचे सर्व उपाय केल्याचे सांगितले जाते.

शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्थाकाला आग लागली. त्यामुळे दोन तासाहून अधिक काळ या मार्गावरील मेट्रोचे संचालन ठप्प झाले होते. त्याचा प्रवाशांना फटका बसला. यासंदर्भात संध्याकाळी महामेट्रोने निवेदन जारी केले.

त्यानुसार स्थानकावर लावण्यात आलेल्या सौर पॅनलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने सौम्य स्वरुपाची आग लागली होती. ती लगेच नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमुळे ५० मिनिटे मेट्रोचे संचालन थांबले होते, दुपारी १२.२० नंतर सेवा पूर्ववत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाचे चौकशीचे आदेश महामेट्रो प्रशासनाने दिले आहे. दरम्यान यापूर्वीही मेट्रोच्या संचालनात अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे बिघाड झाल्याच्या नोंदी आहे. अमरावती मार्गावरही यापूर्वी धावती मेट्रो तांत्रिक कारणामुळे थांबली होती. आगीच्या घटनेमुळे मेट्रो स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.