नागपूर : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास नागपुरात अटक केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात जाधव हे न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने जाधव यांना अटक करुन कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे जाधव यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी २०१४ मध्ये विमानतळावर उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांच्या मंत्रालयीन सहायकाला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्यावेळी त्या मंत्रालयीन सहायकाने सोनेगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरुन सोनेगाव पोलिसांनी जाधव यांच्यावर शिवीगाळ करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. २०१४ मध्ये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात खटला सुरु असताना न्यायधीशांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, जाधव न्यायालयात उपस्थित राहत नव्हते.  न्यायालयाने त्यांना वारंवार समन्स बजावले होते.मात्र, जाधव  न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने गेल्या आठवड्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र नोटीस (एनबीडब्ल्यू) बजावली  होती. त्यामुळे सोमवारी दुपारी हर्षवर्धन जाधव आपल्या वकिलांसह न्यायालयात उपस्थित झाले.  न्यायालयाने त्यांना वारंवार अनुपस्थित राहण्याचे कारण विचारले.  न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे  उल्लंघन केल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले व   त्यांना अटक करण्याचे तसेच जाधव यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश पोलिसांना  दिले.

पोलिसांनी केली अटक

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, जाधव यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार डॉक्टरांकडे केली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. उपचारानंतर जाधव यांनी रितसर अटक करण्यात येणार असून मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

“माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध सोनेगाव पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात जाधव हे आरोपी आहे. याच गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.”- नितीन मगर (ठाणेदार, सोनेगाव पोलीस ठाणे)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mla harshvardhan jadhav arrested in nagpur adk 83 amy