गडचिरोली : सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी असक्षम असून मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाला महिन्यातून किमान दोन दिवस तरी वेळ द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करून गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेऊन घेतले. परंतु त्यांना जिल्ह्यात यायला वेळ नाही. यामुळे अनेक महत्वाचे प्रश्न रखडले आहे. अशी टीका काँग्रेसने पत्रकार परिषदेतून केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित मोठमोठे उद्योग सुरु होत आहे. यासाठी लाखो कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा करण्यात येत आहे. परंतु, स्थानिक समस्या जैसे थे आहेत. जिल्ह्यात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. धानाचे चुकारे, बोनस अद्याप मिळालेले नाही. वाळू धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेकडो घरकुलांचे काम रखडलेले आहे. कंत्राटदारांचे देयके प्रलंबित असल्याने विकासकामे खोळंबली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विमानतळ आणि विविध उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात सुपीक शेतजमिनी संपादित करण्याचे कार्य सुरु आहे.

याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. तुटपुंज्या मोबदल्यात सुपीक शेती शासनाला दिल्यास भविष्यात काय खायचे हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. लोह प्रकल्पात स्थानिकांना रोजगार नाही. अवजड वाहतुकीमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कुरखेडा उपविभागात वीजकपात सुरु आहे. वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नाही. राष्ट्रीय महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांचे काम अर्धवट आहेत. मनरेगाचे कोट्यवधी थकीत आहेत. असे शेकडो गंभीर प्रश्न प्रलंबित असताना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासाठी वेळ नाही. सह पालकमंत्री आशिष जयस्वाल हे प्रश्न सोडविण्यात सक्षम नाही. केवळ उद्योगाचे नाव घेतल्याने जिल्ह्याचा विकास होणार नाही.

त्यामुळे पालकमंत्री फडणवीस यांनी महिन्यातून किमान दोन दिवस जिल्हासाठी वेळ द्यावा अशी मागणी काँग्रेसने पत्र परिषदेतून केली आहे. अन्यथा काँग्रेस जिल्हाभरात मोठे आंदोलन उभे करणार असेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, सतीश विधाते यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळी भूमिजनाला एकत्र दुपारी टीका

१५ मे रोजी आरमोरी येथे अमृत योजना २.० अंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, तहसीलदार उषा चौधरी, अशोक नेते, कृष्णाजी गजबे, महेंद्र ब्राम्हणवाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ५७ कोटी रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेतून ९१ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकून घराघरात शुद्ध नळपाणी पोहोचविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सगळे नेते एकत्र होते. त्यांनंतर दुपारी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत टीका केल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.