लोकसत्ता टीम
वाशीम : एकिकडे आरक्षणाची लढाई चालू असताना दुसरीकडे सरकार नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करून जगण्याच्या मुलभुत हक्कांवरच घाला घालू पाहत आहे. कंत्राटीकरण आणून सरकार आरक्षण संपविण्याचा घाट घालत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी केला.
संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन वाशीम येथे २ डिसेंबर २०२३ रोजी महाअधिवेशनानिमीत्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अँड. मनोज आखरे बोलत होते. यावेळी विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड. मनोज आखरे म्हणाले की,कमी पटसंख्या असणाऱ्या जवळपास १४७८३ शाळा बंद करण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे जवळपास १८५४६३ मुले शाळाबाह्य होणार आहेत. तसेच १९७६० शिक्षकांवर अतिरीक्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोठारी आयोगाने सुद्धा (समुह शाळा) ही संकल्पना अंमलबजावणीत अपयशी ठरली. हे मान्य केलं आहे.
आणखी वाचा-पाच लाखांची नुकसान भरपाई द्या, नागपूरच्या पूरग्रस्तांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
तसेच महाराष्ट्रातील ६५ हजार सरकारी शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व माध्यमाच्या शाळा ह्या दत्तक शाळा योजनेच्या नावाखाली खाजगी कंपन्या संख्या दत्तक देण्याचा विचार म्हणजे शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. या निर्णयाचे समाजात व शिक्षण क्षेत्रात खुप वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे दत्तक शाळा योजनेचा निर्णय व समुह शाळा योजनेचा निर्णय मागे घ्यावा. शिक्षकांचे रिक्त पदे त्वरीत भरावीत.असेही ते म्हणाले.
संभाजी ब्रिगेड ची शिवसेना ठाकरे यांच्याशी युती झालेली आहे. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली व बुलढाणा लोकसभेची मागणी शिवसेना ठाकरे गटाशी केलेली आहे. असेही आखारे यांनी सांगितले.