नागपूर : हवामानाचे चक्र उलट फिरायला लागले असून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंची सरमिसळ झाली आहे. यावर्षी तर उन्हाळ्यातील अधिकांश दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याकडून आज, गुरुवारी देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही जिल्ह्यात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. तर यावेळी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे. सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज, गुरुवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उन्ह-पावसाच्या खेळामुळे वातावरणात उकाडा प्रचंड वाढला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा…अमरावती : विवाहितेचे अपहरण करून अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि अकोला या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अकोला शहरातील तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर आहे. विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे. आताही या सर्व जिल्ह्यांना “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. अतिशय महत्वाचे असेल तरच दुपारच्या वेळी घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे, असे आरोग्य विभागाने म्हंटले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात देखील उष्णतेसह दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd issues unseasonal rain and severe heat wave warnings yellow alert for multiple districts in maharashtra rgc 76 psg