बुलढाणा: पहलगाम अतिरेकी हल्ल्यावरून देशात संतापाची लात उसळली. भारत व पाकिस्तान या दोन देशातील संबंध विकोपाला गेलेत. या दरम्यान केंद्रातील भारतीय जनता पक्ष आघाडी सरकारने देशात जातीनिहाय जन गणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

बुलढाणा तालुका भाजपाकडून आज घेण्यात आलेल्या कार्यक्रमातही असा समिश्र भाव उमटला. आज शुक्रवारी, २ मे रोजी दुपारी संगम चौक परिसरातील शिव स्मारक समोर तालुका भाजपचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी देशव्यापी जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे व्यापक स्वागत करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे जाहीर आभार मानण्यात आले.

केंद्र सरकारच्या जातीनिहाय जनगणना करण्याच्या लोककल्याणकारी निर्णयाचे भारतीय जनता पार्टी बुलढाणा तालुक्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच मोदी सरकारला धन्यवाद देण्यात आले, आभार मानण्यात आले. तसेच काँग्रेस वर टीका करुन निषेधही व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलतांना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या अनेक काळापासून काँग्रेसप्रणित सरकारे देशात दीर्घकाळ सत्तेवर राहून सुद्धा जातीनिहाय जनगणना करण्याचे याआधीच्या त्यांच्या कुठल्याच सरकारने धाडस दाखविले नाही. मात्र आता हेच ( काँग्रेससारखे) विरोधक फुकटचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे. त्यांच्या केविलवाण्या धडपडीचा जाहीर निषेध करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदय कल्याणाचा नारा देऊन समाजातील प्रत्येक जाती धर्मातील शेवटच्या सामान्य माणसापर्यंत विकासाची फळे कसे पोचतील यासाठी प्रयत्न करण्याचा एकात्ममानववादाचा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्याप्रमाणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा करून अंत्योदय उद्धाराचा पाया रचला असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

देशहितासाठी सर्वोच्च असलेले अनेक ऐतिहासिक निर्णय घेणारे मोदी सरकार आज पुन्हा एकदा आपल्या जातीनिहाय जनगणनेच्या लोककल्याणकारी निर्णयाने देशवासीयांच्या कौतुकास पात्र ठरले असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित बुलढाणा शहर व तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणानी संगम चौक परिसर दुमदुमला.

‘मोदी सरकार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘धन्यवाद मोदीजी’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपचे ॲड.मोहन पवार, डॉ. राजेश्वर उबरहंडे, भगवान एकडे, स्मिता चेकटकर, सिंधु खेडेकर, उषा पवार, विनायक भाग्यवंत, योगेश राजपूत, सतिश भाकरे पाटील, मंदार बाहेकर, अरविंद होंडे, सतिश देहाडराय, विश्राम पवार, चंद्रकांत बर्दे, प्रदीप बेगाणी, कुलदीप पवार, शरद एकडे, राजेश पाठक, प्रवीण गाडेकर, प्रतीक गायकवाड, अभिषेक वायकोस, किसन खेडेकर, किशोर लांडगे यांच्यासहतालुका भाजपचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते .