गोंदिया : शुक्रवार पहाटेपासूनच पावसाने जोर धरला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सततच्या पावसामुळे जलाशये, तलाव आणि नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आमगाव- गोंदिया मार्गावरील पांगोली नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी जात असल्यामुळे शनिवारी आणि आज रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही वाहतूक बंदच आहे. पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पूर ओसरला तरी रविवारी देखील वाहतूक सुरू होणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता . मध्यंतरी पावसाने दीर्घ हुलकावणी दिली होती. त्यामुळे धानपीक धोक्यात आले होते. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करत असल्याचे दिसून आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र तान्हा पोळयाच्या दिवशी शुक्रवारी पावसाने दमदार कमबॅक केला. दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील पाऊस झाला. त्यामुळे शिवार जलमय झाले. तलाव, नद्या, नाल्यांतील पाणी पातळीत वाढ झाली. पांगोली नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली. शुक्रवारी सकाळपासून आमगाव-गोंदिया मार्गावरील पर्यायी पुलावरून चार फूट पाणी वाहू लागले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली. आमगाव मार्गावरील वाहतूक तुमखेडा आणि चुलोद मार्गाने वळविण्यात आली. रविवारीदेखील पांगोली नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक सध्या बंद आहे.

हेही वाचा : चंद्रपूर : आठ तास अभ्यास, आठ तास झोप, मित्रांसोबत गप्पा आणि..; पोलीस अधीक्षक परदेशी आणि विद्यार्थ्यांमध्ये रंगल्या आयएएस होण्याच्या गप्पा

पर्यायी मार्गापैकी काही भाग पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर वाहून गेला. पाणी पातळीत वाढ सुरू असल्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे वक्रद्वार उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने कासा, डांगोरली, काटी, बिरसोला आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आमदार विनोद अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाची पाहणी करून सूचना दिल्या.

हेही वाचा : श्री गणेश चतुर्थीचे व्रत, जाणून घेऊया नेमकं शास्त्र काय?

तिरोडा तालुक्यातील दोन रस्ते बंद

तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक मार्गानादेखील त्याचा फटका बसला आहे. तिरोडा तालुक्यातील मरारटोला ते करटी आणि घोगरा ते घाटकुरोडा या मार्गावरील नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने पहारा लावला आहे.

प्रकल्पांतील पाणीसाठा

शनिवारी इटियाडोह प्रकल्प ९७.९९ टक्के, शिरपूर प्रकल्प ७८.२३ टक्के, कालीसरार ८४.०८ टक्के, पुजारीटोला प्रकल्प ८९.१८ टक्के आणि धापेवाडा प्रकल्प ३७.२९ टक्के भरले आहे.

हेही वाचा : ‘त्या’ कंत्राटदाराला संपूर्ण राज्यात काळ्या यादीत टाका, पाणी प्रश्नावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अहीर आक्रमक

कटंगी प्रकल्प ओव्हर फ्लो

गोरेगाव तालुक्याला पाणीपुरवठा करणारे कटंगी धरण १५ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले. गेल्या वर्षीही हे धरण भरून वाहू लागले होते. तर यंदा धरण भरण्यासाठी सप्टेंबर
अखेर पर्यंत वाट पाहावी लागली. पावसामुळे जिल्ह्यातील जनतेची पाण्याची चिंता दूर झाली असली, तरी गोंदिया जिल्ह्यातील जनतेला उन्हाळी हंगामात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gondia traffic on gondia aamgaon road stopped for third consecutive day due to water level increased in pangoli river sar 75 css