नागपूर : जूनच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय झालेल्या मोसमी पावसाने दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस मात्र विश्रांती घेतली. मात्र, येत्या २० जूननंतर मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोसमी पाऊस वेळेआधीच राज्यात दाखल झाला. अंदमान-निकोबार नंतर केरळमध्ये तो दाखल झाला. तर त्यानंतर पुणे, मुंबई, कोल्हापूर या शहरात देखील वेळेआधीच मोसमी पावसाचे आगमन झाले. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर येथेही मोसमी पाऊस दाखल झाला. मात्र, त्यानंतर मोसमी पावसाची वाटचाल रखडली. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत धडकल्यानंतर मोसमी पावसाने विदर्भ आणि मराठवाड्याकडे आपला मोर्चा वळवला. मात्र, विदर्भातील काही भागात पोहचल्यानंतर मान्सूनची पुढे सरकला नाही.विदर्भ-मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. तापमानातही फारशी घट झालेली नसून उकाडा प्रचंड वाढला आहे.

हेही वाचा : रामटेकमधील काँग्रेसच्या विजयात ठाकरे गटाचेही योगदान – जाधव

विदर्भातील अनेक शहरांमध्ये अजूनही तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे. दरम्यान, मोसमी पावसाचा प्रवास रखडण्यामागे अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याचे कारण आहे. राज्यात आज १६जूनला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पावसाबरोबरच वादळी वारे देखील वाहणार असून वाऱ्यांचा वेग ताशी ३०-४० किलोमीटर प्रतितास असू शकतो, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढेल, असे हवामान खात्याने सांगितलं आहे.