नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मुलीशी शारीरिक संबंधासाठी बळजबरी केल्याप्रकरणात प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यात त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. मात्र, तुरुंगातून बाहेर येताच त्या युवकाने प्रियसीच्या घरी जाऊन तिच्या डोक्यावर दारूची बाटली मारून तिला गंभीर जखमी केले. ही घटना कळमना पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी ३५ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून तिचा प्रियकर राकेश विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा : नागपूर: भरधाव कारची झाडाला धडक, दोन ठार

पीडित ३५ वर्षीय महिला मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. पतीशी पटत नसल्याने ती १२ वर्षांपूर्वी दोन मुलींना घेऊन नागपुरात आली. या दरम्यान तिची आरोपी राकेशशी ओळख झाली. दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये राहू लागले. राकेशपासून तिला दोन मुले आहेत. काही महिन्यांपूर्वी राकेशने महिलेच्या १६ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केले. परंतु, आईचा प्रियकर असल्यामुळे तक्रार न करता मुलीने सहन केले. त्यामुळे राकेशची हिंमत दिवसेंदिवस वाढत गेली. तो मुलगी घरी आल्यानंतर तिच्याशी नेहमी अश्लील चाळे करायला लागला. ती आंघोळीला गेल्यानंतर बाथरुममध्ये वाकून बघायला लागला. ती कपडे बदलत असताना तिच्याशी अश्लील वर्तन करीत होता. आईच्या प्रियकराचा त्रास असह्य झाल्यामुळे मुलीने या प्रकरणाची तक्रार कळमना पोलिसांत केली.

हेही वाचा : सोलार कंपनीत स्फोट : ‘आता आम्ही कुणाच्या भरोशावर जगावं?’, आरतीच्या दिव्यांग आईवडिलांचा सवाल

पोलिसांनी गुन्हा नोंदवून राकेशला अटक केली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तेव्हापासून तो तुरुंगात होता. चार दिवसांपूर्वी राकेश तुरुंगातून सुटला. पीडित महिलेने त्याला आपल्या घरी येण्यापासून अडविले. त्यामुळे तो आपल्या आईकडे राहायला गेला. तो पीडितेवर संतापलेला होता. मंगळवारी सायंकाळी तो दारूच्या नशेत पीडितेच्या घरी आला. शिविगाळ करून धमकावू लागला. विरोध केला असता राकेशने पीडितेवर दारूच्या बाटलीने हल्ला केला. डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले आणि फरार झाला. शेजाऱ्यांनी पीडित महिलेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून राकेशचा शोध सुरू केला आहे.