नागपूर : वाहतूक कोंडी, अपघाताला आवर घालण्यासाठी वाहतूक शाखेने शहरात गणेश स्थापनेपासून खासगी बसेसच्या बंदीचा श्रीगणेशा केला. मात्र, वाहतूक शाखेच्या आदेशाला पायदळी तुडवत खासगी बसचालकांनी वाहतूक शाखेच्या नाकावर टिच्चून मनमानी सुरू केली आहे. वाहतूक शाखेच्या आदेशांचे असे सर्रास उल्लंघन होत असताना परिमंडातील अधिकाऱ्यांना मात्र ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातच रस उरला आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शहरातील रस्त्यांवर खाजगी बसेस थांबवण्यास आणि पार्किंग करण्यास वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी बंदी घातली होती. खासगी बसचालक पार्किंगची व्यवस्था असलेल्या ठिकाणावरूनच प्रवासी बसवू अथवा उतरवू शकतील, असेही पोलिसांनी बजावले होते. मात्र, वाहतूक शाखेच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत खासगी बसचालक मनाला वाटेल तेथून प्रवासी उचलतात आणि त्यांना कुठेही आणून सोडतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसत आहे.

खासगी बसेसवरील बंदीमुळे छत्रपती चौक, भरतनगर, रविनगर, इंदोरा, म्हाडा कॉलनी, छावणीतील रहिवासी आनंदी होते. दलालांकडून रोज होणारी शिवीगाळ आणि कर्णकर्कश हॉर्नपासूनही सुटका होणार असल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, आता पुन्हा बैद्यनाथ चौक, सेंट्रल ॲव्हेन्यूवरील गीतांजली सिमेमागृह, इंदोरा चौक, दिघोरी, छत्रपती चौक, सक्करदरा, कृपलानी चौक, अमरावती मार्गांवर पहिल्यासारखेच प्रवासी उतरवणे व बसवणे सुरू झाले आहे. गणराज, धनश्री. चिंतामणी, हिंदुस्थान, डीएनआर, पूजा, दादा गुरुदेव, जागिरदार, रॉयल, डॉ. आंबेडकर ट्रॅव्हल्सच्या बसेस रस्त्यावर सर्रास उभ्या दिसतात.

परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’

बसचालकांच्या मनमानीमुळे शहरातील सर्व मार्गांवर वाहतूक व्यवस्था पुन्हा कोलमडत आहे. अपघात वाढण्याचा धोकाही कायम आहे. अशा परिस्थितीत वाहतूक शाखा पोलीस उपायुक्तांनी नवी अधिसूचना जारी करीत १२ मार्च २०२६ पर्यंत मनाई आदेश कायम राखण्याचे निर्देश दिले. पोलिसांच्या या नव्या आदेशालाही खासगी प्रवाशी बसचालकांकडून पायदळी तुडवले जात आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ दिसत आहे. कदाचित बसचालकांना सूचनाच मिळाली नसल्याने पुन्हा बसेसची गर्दी दिसत असल्याची शक्यता आहे.

मनमानीला अधिकाऱ्यांचेच अभय?

शहराबाहेर मध्य भारतातील छिंदवाडापासून ते शिवनी, इंदोर आणि दक्षिणेकडील हैदराबाद, आदिलाबादपासून ते मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सोलापूर- कोल्हापूरकडे धावणाऱ्या बसेस कॉटन मार्केट, सीताबर्डी, वाडी, अजनी, सक्कदरा, कामठी, सोनेगाव, सदर परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातून जातात. त्यामुळे या परिमंडळातील अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली, तर एका दिवसात बसचालक वठणीवर येऊ शकतात. मात्र, अधिकाऱ्यांची मर्जी असल्याशिवाय बसचालक मनमर्जीने धाडस करू शकत नाही. त्यामुळे या मनमानीला वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांचेच अभय आहे का, ही शंका येते. तर खासगी बस चालक आमचे ‘सेट’ आहे, असे उघडपणे बोलतात.

पोलिसांची ७ विशेष पथके बेपत्ता?

बसचालकांच्या मनमानीला लगाम बसावा यासाठी वाहतूक साखेने ७ पथके तयार केली होती. मात्र, ही पथके कुठे काम करतात, हाच आता संशोधनाचा विषय आहे. सध्या रस्त्यांवरील चित्र पाहून बसचालकांवर वाहतूक शाखेचे कसलेही नियंत्रण राहिलेले नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.