नागपूर : भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून प्रवासी तिकिटांच्या दरात किरकोळ वाढ जाहीर केली असून, नागपूरकरांसाठी ही वाढ छोट्याशा रकमेत असली तरी समाज माध्यमांवर मात्र ती मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. नागपूरहून दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आता ८ ते २५ रुपयांपर्यंत जास्त भाडे भरावे लागणार आहे. रेल्वेने केलेल्या या प्रवास भाडेवाढीमुळे नागपूरकरांना २५ रुपये पर्यंतचा फटका बसणार आहे. प्रवाशांनी भाडेवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली असून ‘फक्त भाडे वाढते, सेवा कधी वाढणार, असा प्रश्न केला आहे.
वाढ कशी झाली?
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, साधारण (द्वितीय) वर्ग (५०० किमीहून अधिक): ०.५० रुपये प्रति किमी, नॉन एसी मेल /: १ रुपये प्रति किमी भाडेवाढ करण्यात आली आहे. यामध्ये एसी कोच (चेअर कार,३एसी, २एसी): २ रुपये प्रति किमी अशी वाढ करण्यात आली आहे. नागपूर-दिल्ली (११५० किमी) प्रवास करताना वातानुकूलित (एसी) डब्यातून प्रवाशांना आता सुमारे २३-२५ रुपये जास्त मोजावे लागतील. तर नागपूर-मुंबई (८४१ किमी) मार्गावर वातानुकूलित (एसी) डब्यातून प्रवासासाठी सुमारे १६-१७ रुपये वाढ झाली आहे.
रेल्वे सेवा सुधारणार कधी?
समाज माध्यमांवर प्रवाशांनी भाडेवाढीबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत: भाडे वाढवायला वेळ लागत नाही, पण स्वच्छता, वेळेचे पालन अजूनही ढिलं आहे. २५ रुपये वाढ मान्य आहे, पण ट्रेन वेळेवर आली तरच फायदा, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, रेल्वेने तात्काळ तिकिटासाठी आधार ओटीपी सक्तीचे केले असून, ट्रेन चार्ट आता प्रस्थानाच्या आठ तास आधी उपलब्ध होईल. यामुळे वेटिंग लिस्टवाल्यांना अधिक पारदर्शकता मिळेल. या सुधारणांमुळे प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेची ही भाडेवाढ आर्थिकदृष्ट्या किरकोळ वाटली तरी, वाचकांना ती सेवा आणि सुविधांच्या पार्श्वभूमीवर स्वीकारावी लागणार आहे. वाढलेली अपेक्षा आणि बदललेली किंमत यामध्ये आता रेल्वे सेवा तशीच राहिल्यास नाराजीचा सूर आणखी वाढू शकतो.
मुंबई प्रवाशांवर रेल्वे भाडेवाढीचा परिणाम : १५ ते ३०० रुपये अधिक मोजावे लागतील. मुंबईतील दररोजच्या प्रवाशांसाठी, विशेषत: ज्यांनी दूरवरून येणाऱ्या गाड्यांचा वापर करतात, या वाढीचा परिणाम मोठा आहे. शॉर्ट डिस्टन्स प्रवास (उदा. मुंबई लोकलच्या बाहेरील प्रवाशासाठी): १५-५० रुपये अधिक खर्च होणार आहे. मुंबई ते पुणे (१५० किमी): नॉन-एसी प्रवाशांसाठी सुमारे १५० रुपये वाढ आणि एसी प्रवाशांसाठी सुमारे ३०० रुपये पर्यंत वाढ आहे.