नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपूरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. टोळ्यांनी उच्छाद मांडल्याने रोज हाणामाऱ्या, लूटपाट, चोऱ्यांच्या घटना वाढत असताना टोळी तयार करून गुन्हेगारी कृत्य करणारा एक मारेकरी तब्बल चार महिने पोलिसांच्या हातावर तुरी देत मोकाट फिरत होता. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याला सापळा रचून अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले.
चार महिन्यांपूर्वी भर लग्न समारंभात शेकडोंच्या उपस्थितीत एकाचा खून करून हा गुंड फरार झाला होता. मारेकरी दरवेळी तो पोलिसांना चकमा देत होता. बिरजू दिपक वाढवे असे या मारेकऱ्याचे नाव आहे. बिरजुने भर लग्न समारंभात विहांग मनिष रंगारी या तरुणावर हल्ला करीत त्याचा खून केला होता. २० फेब्रुवारीला घडलेल्या ही थरारक घटना बिडगावातल्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात घडली होती.
या लग्नावर नाराज बिरजूनेआपल्या गुंड साथीदारांसह आधी लग्न समारंभात गोंधळ घातला. नातेवाईकांना शिवीगाळ सुरू केली. त्याच वेळी विहांग हा त्याला समजावण्यासाठी आत आला. संतापाच्या भरात बिरजून विहांगवर चाकूने हल्ला करीत त्याला जखमी केले. त्यानंतर बिरजूचा साथीदार आर्यन उईके आणि अन्य जणांनी विहांगवर सिमेंटच्या विटांनी हल्ला केला. यात विहांगच्या छातीला जबर दुखापत झाली. विहांग रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना हे थरार नाट्य करीत बिरजू आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळाले. जखमी विहांगला मेयोत नेले जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
९ जणांवर मोक्का
घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिसांनी तत्काळ खून प्रकरणात ८ जणांना ताब्यात घेतले होते. यात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश होता. आरोपींनी टोळी तयार करून हा गुन्हा केल्याचे तपासात सिद्ध झाले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली होती. या खून प्रकरणातला सूत्रधार बिरजू फरार असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र दरवेळी बिरजू पोलिसांना चकमा देत होता. बिरजूच्या मुसक्या बांधण्यासाठी यशोधरा नगर पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेत त्याचा शोध सुरू केला होता. बुधवारीरात्री पोलिसांना यात यश आले. पोलिसांनी सापळा रचत बिरजूला अटक केली.चार महिन्यांपासून फरार असलेल्या मारेकऱ्याला अटक झाल्याने खूनाचा नेमका उलगडा होणार आहे.